पान:निर्माणपर्व.pdf/9

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पण बहुतेकजण गावी सुखरूप पोचलेले होते. शंभर क्विंटलपैकी पंधरा एक क्विंटल धान्य पोलिसांना परत मिळाले.

 आम्ही मंडळी दोन-तीन तास पाटीलवाडीवर होतो. सकाळी जगन्नाथ पाटील यांचे वडील डॉ. विश्राम हरी पाटील यांचीही शहादे मुक्कामी गाठ घेतलेली होती. या दोघांनी सांगितले की, नेहमीच्या लोकांचे हे कृत्य नाही. आसपासच्या चार-पाच गावातील लोक तरी या जमावात नसावेत. गेल्या ३०-४० वर्षात कधीही पाटीलवाडीला असला प्रकार घडलेला नव्हता.

 मजुरांशी, आदिवासींशी पाटलांचे संबंध अतिशय चांगले होते. विश्राम हरी पाटलांनी तर सांगितले की, आयुष्यात त्यांनी कधी पै-पावण्याची सावकारी केली नाही. असंतोष असण्याचे काही कारणच त्यांना दिसत नव्हते.
 आम्ही दोन-चार प्रश्न सकाळी वडिलांना व दुपारी मुलालाही विचारले !

 १ : सातआठशे-हजार लोक जमतात आणि आदल्या क्षणापर्यंत तुम्हाला याची कुणकुणही लागू नये, हे जरा चमत्कारिक वाटते. वाहनांची सोय नसता, या डोंगराळ भागात एवढा जमाव गुपचुप जमविणे फार अवघड आहे.
 २ : दरोडे साधारणतः रात्री घातले जातात. जमावाने या वेळी सकाळची वेळ का निवडावी ?
  ३ : धान्याव्यतिरिक्त एकही मौल्यवान वस्तू घरातून हलवली जात नाही. सगळे जिथल्या तिथे होते. दरोडेखोरीत, लूटमारीत हे बसत नाही.
 ४ : लुटीतही काही गडबड गोंधळ उडालेला दिसत नाही. सगळेजण शांतपणे आपापला ठराविक मोजका वाटा जसा काही नेत आहेत. हेही दृश्य जरा वेगळे वाटते.
 ५ : एक सज्जन आणि प्रगतिशील शेतकरी म्हणून डॉ. विश्राम हरी पाटलांना या भागात फार मान आहे. आदिवासी शेतमजुरांचे शोषण करणारी, त्यांचेवर दिवसाढवळ्या जुलुम व अत्याचार करणारी शेकडो गुजर पाटील मंडळी व बडे जमीनदार या भागात हयात असताना जमावाने विश्राम हरी पाटलांच्या शेतीवाडीवरच आपले लक्ष का केन्द्रित करावे ?

 या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे अद्याप तरी आम्हाला मिळालेली नाहीत.

 पाटीलवाडीनंतर दुपारी घडले म्हसावद प्रकरण. म्हसावद हे पाटीलवाडीजवळचे ३।४ मैलांवरचे गाव. जमावापैकी काहीजण या गावचे होते. गोळा केलेल्या धान्याची गाठोडी घेऊन हे लोक गावाकडे परतत होते. काही गावात पोचले, काही वाटेत होते.

निर्माणपर्व । ८