पान:निर्माणपर्व.pdf/6

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.




शहादे






 पाप आणि पुण्य जेथे नेहमी एकत्र नांदते तेथे मी, एका दुपारी
 एक-दोन वकीलमित्रांमुळे पोचू शकलो होतो.
 विनोबाजींची गीता प्रवचने येथे प्रकटली .
 असंख्य खुनी दरोडेखोर येथे फासावर लटकले.
 तो धुळ्याचा मध्यवर्ती तुरुंग होता.

 रविवार असूनही तुरुंगाधिकाऱ्यांनी आरोपींची भेट घेण्याचा आमचा अर्ज विचारात घेऊन त्याप्रमाणे व्यवस्था केली होती.
 आरोपी होते एकूण ९६.

 सर्वांची भेट घेणे शक्य नव्हते. यादीवरून चार गावांचे चौघेजण निवडले.

 सुका झुल्या भिल, अनकवाडे
 मोतीराम गुमान भिल, पाडळदे
 मंगा दरासिंग भिल, लक्कडकोट
 रायसिंग सोन्या भिल, रामपूर

 चौघेजण भेटीच्या खोलीत आले. भिंतीशी टेकून माना खाली घालून बसले. या सावल्यांशी काय बोलावे हा प्रश्नच पडला होता.
 या चौघांपैकी तीन तर अगदी तरुण दिसत होते. एक जरा उतारवयाचा वाटला.

 या सर्वांवर पुढील कलमान्वये फार गंभीर आरोप ठेवले गेलेले आहेत-- कलम १२० (ब) कट करणे, कलम १४७ दंगा करणे, १४८- ठरवून बेकायदेशीर जमाव करणे व गुन्हा करणे, १४९- गुन्हा करून जखम करणे, ३०७- खून करण्याचा प्रयत्न करणे, ३२३- साधी जखम करणे, ३२४- गंभीर जखम करणे व ३९५ -दरोडा घालणे, ३९७-३९८ घातक शस्त्रे हातात घेऊन दरोडा घालणे--

शहादे । ५