टोळकी करून गावभर भटकण्यासाठी किंवा हॉटेलात बसून धुराच्या वर्तुळात चकाट्या पिटण्यासाठी हे आवाहन नव्हते. 'खेड्यात चला' हा गांधीजींचा मंत्रच जयप्रकाश पुन्हा तरुणांना ऐकवत होते. गुजराथेतील भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातसुद्धा हा नवनिर्मितीचा अंश होताच, जरी पुढे तो लुप्त झाला आणि हितसंबंधीयांनी आंदोलनाचा कबजा घेतला तरी. असे सगळ्या आंदोलनात कमीजास्त प्रमाणात होतच असते. अगदी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनही याला अपवाद नाही. विरोधी पक्ष केवळ एकत्र येण्याने ही विधायक प्रतिमा निर्माण होणार नाही. त्यांनी जयप्रकाश आंदोलनातील नवनिर्माणाचा हा तुटलेला धागा पुन्हा जोडून घ्यायला हवा. इंदिरा गांधींनी नवनिर्माणाचे आव्हान अचूक ओळखले व समाजातील अगदी खालच्या वर्गांना आकर्षित करील असा वीस कलमी कार्यक्रम आणीबाणी पाठोपाठ ताबडतोब जाहीर करून टाकला. जनतेला भ्रष्टाचाराविषयी घृणा वाटू लागली आहे, याचीही त्यांनी नोंद घेतली व आणीबाणीचा यादृष्टीनेही काही वापर केला. एकीकडे त्यांनी नवनिर्माण आंदोलन चिरडून टाकले आणि दुसरीकडे या आंदोलनातील सत्वांश ग्रहण करून त्या पुढे झेपावल्या. एकत्रित आलेल्या लोकशाहीवादी विरोधीपक्षाने-प्रतिपक्षाने, लोकशाही रक्षणाप्रमाणेच नवनिर्माणाची इंदिरा गांधींच्याही पुढची झेप घेण्याची तयारी दाखवल्याशिवाय, त्यांची पूर्वीची नकारात्मक प्रतिमा पुसली जाणार नाही व हुकमाचे एकही पान त्यांच्या हाती येणार नाही. सत्ताधाऱ्यांच्या चुकांचे भांडवल करून विरोधी पक्ष एक बिनहुकमी डाव गेली पंचवीस वर्षे खेळत आलेले आहेत. याचा त्यांना नसला तरी लोकांना खरोखरच कंटाळा आलेला आहे. लोकशाहीरक्षण आणि नवनिर्माण या दोन पायांवर नवा प्रतिपक्ष उभा रहू लागला तरच हा कंटाळा दूर होईल आणि आज नाही उद्या एखादी वेगळी वाट दृष्टोत्पत्तीस येईल. अशी वेगळी व नवी वाट दीर्घकाळ चोखाळण्याची तयारी नसेल तर इंदिरा गांधींचे धक्कातंत्र नेहमीच यशस्वी होत राहील आणि विरोधकांना तक्रारी करत राहण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताच कार्यक्रम शिल्लक उरणार नाही. दोन-चार जागा कमी मिळाल्या तरी चालतील परंतु एकत्रित आलेल्या विरोधी पक्षांनी खराखुरा पर्यायी प्रतिपक्ष लोकांसमोर ठेवावा. लोक आपणहून त्यांच्या मागोमाग येतील. कारण केंद्रीकरणाचा अतिरेक, लोकशाहीवरील बलात्कार कोणालाच नको आहे. पण प्रगतीचा वेगही मंदावून उपयोगी नाही. ही दोन्ही आव्हाने पेलू शकणारा समर्थ प्रतिपक्ष ही आजची राजकीय गरज आहे. एकत्रित आलेल्या विरोधी पक्षांनी ही गरज ओळखून आपली वाटचाल सुरू केली तर यश दूरचे असले तरी अप्राप्य नाही.
जानेवारी १९७७