पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१९९६ ला 'निहार' मधून बाहेर पडल्या. सन १९९७ ला त्यांनी एड्सग्रस्त बालकांसाठी 'मानव्य' संस्था सुरू केली. फेब्रुवारी २००५ ला निधन होईपर्यंत त्या कार्यरत राहिल्या.
 त्यांच्या जीवन व कार्याकडे पाहत असताना लक्षात येतं की, समाजाच्या दृष्टीनं उपेक्षित, किळस, पाप समजणाच्या व्यवसाय व स्त्रियांत त्यांनी माणूसपण शोधलं. निर्माण केलं. त्यांची दु:खं त्यांनी आपली मानून ती पराकोटीच्या निरपेक्षपणे दूर केली. त्यांची मुलं आपली मानून त्यांचे संगोपन, शिक्षण व पुनर्वसन केलं. ते करताना सतत त्या अस्वस्थ, असमाधानी राहिल्या. रोज आणखी काही अधिकची गुणात्मक भर घालत राहायचा त्यांचा प्रयत्न अनुकरणीय होता. त्या संघर्षास कधी हार गेल्या नाहीत. कष्टाने थकल्या नाहीत. 'जो देगा उसका भला, न देगा उसका भी भला' अशा फकिरी वृत्तीने त्या सतत करत राहिल्या. वेश्या व त्यांची मुलं यांना त्यांनी 'माणूस' बनवलं ही त्यांची सामाजिक देणगी! स्वकियांच्या सदिच्छा व सामाजिक मूक संमती व सद्भाव केवळ एवढ्याच बळावर त्यांनी समाजाला या वंचित समुदायाकडे सदाशय वृत्तीने पाहण्याची आपणास दृष्टी दिली. आज महाराष्ट्रात वेश्या व त्यांची मुलं यांचा सांभाळ करणाच्या संस्थांचं जाळं उभं आहे, विजयाताई त्यांच्या जनक ठरल्या खऱ्या!
 वेश्यांना लाभलेल्या मातृत्वाचा त्यांनी सांभाळ केला. ते मातृत्व त्यांना मिरवता आलं पाहिजे, म्हणून त्यांना माणूस म्हणून समाजात प्रतिष्ठित, पुनर्वसित करण्याचा ओनामा त्यांनी घालून दिला. हे सारं त्या निगर्वी व निरपेक्षपणे करत राहिल्या. पांढरपेशा स्त्रीनं ज्या काळात वेश्या वस्तीत जाणं विटाळापेक्षा कमी नव्हतं, त्या काळात त्यांनी आगळ्या-वेगळ्या समाजकार्यास सोवळं बनवलं. घृणेस करुणेचं कोंदण देऊन त्यांनी स्त्री असून साहस दाखवलं. विजयाताईंच्या आयुष्यात एक दोन प्रसंग तर असे आले की, जिवावर बेतलं असतं, तर त्या तोंडही दाखवू शकल्या नसत्या; पण घरवाली घरंदाज निघाली आणि त्या सहीसलामत सुटल्या; पण सभ्य समाजानं त्यांना दगा दिला. किळसवाणं कार्य अंगीकृत मानण्यात नि निरंतर करण्यात त्यांचे वेगळेपण होतं. त्यांचे प्रत्येक पाऊल नवं साहस होतं. कोणी विकेट घ्यायला गेलं, तर त्या मोठ्या शिताफीनं दुसऱ्याची विकेट उडवायच्या; पण समाजकार्यकर्त्यांचा बुरखा घेऊन वावरणाच्या दरवेश्यांना त्यांनी काळाच्या भरवशावर सोडलं. विजयाताई जाऊन दशकही सरलं नाही. ते आपला कस ठेवू शकले नाहीत, यातच विजयाताई लवाटेंचा पुरुषार्थ नि पराक्रम सिद्ध होतो. आपण त्यांच्यासारखे होऊ शकलो नाही, यात त्यांचं अजिंक्यपण होतं.

निराळं जग निराळी माणसं/८६