पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 वेश्या व त्यांची मुलं यांच्या आरोग्य, कुटुंब नियोजन, उपचार, समुपदेशन, संगोपन, शिक्षण या कार्यानंतर त्यांनी आपला मोर्चा एड्सग्रस्त बालकांच्या संरक्षण, संगोपन शिक्षणाकडे वळवला. त्यासाठी 'मानव्य' संस्थेची स्थापना केली. 'गोकुळ'सारखी बालवाडी सुरू करून नव्या कामाची मुहूर्तमेढ विजयाताई लवाटेंनी रोवली. आयुष्य अमृतमहोत्सव साजरं करत असताना त्या हार तुऱ्यात न गुंतता नव्या जोखीम, जबाबदारीत गुंतल्या, समाज ज्याला भ्यायचा ते करण्याकडे त्यांचा कल होता. त्या ज्या काळात वेश्या वस्तीत जात तो काळ नि ज्या काळात त्यांनी एड्सग्रस्तांचे कार्य सुरू केलं तो काळ दोन्ही वेळी समाजाची भूमिका बघ्याची व भाव अस्पृश्याचा होता. विजयाताईंचं मन या उपेक्षेनं अस्वस्थ असायचं. व त्या ते करायला सरसावायच्या. सर्वस्व पणाला लावत काम करणं, हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. म्हणून त्यांनी जे केलं ते समाजाच्या लेखी व्यवच्छेदक ठरलं. शारीरिक, मानसिक, भावनिक, आर्थिक, सामाजिक विकलांगता, वंचितता, उपेक्षितता यांना नेहमी साद घालत राहायच्या. कणव व करुणेच्या बळावर त्यांनी मनुष्य क्रौर्यास नामोहरम केलं. शासन, समाज, व्यक्ती, संस्था, संघटना, माध्यमं यांचा गोफ त्यांनी गुंफला. पण कधी त्यांचा अनुनय त्यांनी केला नाही. अधीन होण्यापेक्षा स्वाधीन मेहनत त्यांनी पत्करली. वेश्यांच्या मुलामुलींचे संगोपन, पुनर्वसन कार्य आरंभ करणाच्या त्या जनक समाज कार्यकर्त्या होत.

•••

निराळं जग निराळी माणसं/८७