पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 हे संशोधन पूर्ण होत आलं असतानाच त्यांना रत्नागिरीच्या महात्मा फुले विद्या प्रसारक सोसायटीची प्राचार्य पदाची ऑफर आली. त्या संस्थेमार्फत 'स. रा. देसाई अध्यापक विद्यालय' सुरू व्हायचं होतं. त्यांना डी.बी.एड., बी.टी. झालेला उमेदवार हवा होता. कुमुदताईंना रत्नागिरीचे सर्व ओळखत होतेच. एव्हाना गांधीवादी कार्यकर्त्या म्हणून त्यांचा जिल्ह्यात लौकिक होता. नामदार पी. के. सावंत यांनी डॉ. चित्राताई नाईक यांच्यामार्फत गळ घातली व कुमुदताई तयार झाल्या; पण एका अटीवर 'संस्थेच्या कार्यकारी मंडळात कोणत्याही राजकीय पक्षाचा विचार न करता शैक्षणिक दृष्टी व विचार असलेले सभासद असावेत. ही संस्था राजकारण विरहित असावी.' विशेष म्हणजे संस्थेनं ही विनंती शिरसावंद्य मानून कुमुदताईंची नियुक्ती केली. सुमारे दोन दशके (१९६१ ते १९८०) त्या प्राचार्य होत्या. प्रारंभी हे महिला अध्यापक महाविद्यालय होतं. पुढे १९७२ ला विद्यार्थीही प्रवेश घेते झाले. या काळात नियमित प्रशिक्षण, पाठ्यक्रमाबरोबर प्राचार्य कुमुदताई रेगे यांनी आपल्या संस्थेमार्फत महात्मा गांधी जन्मशताब्दी, रवींद्र शतकोत्सव, वीर सावरकर संवत्सर इ. निमित्ताने साहित्य, शिक्षण आरोग्य, अंधश्रद्धा निर्मूलन, कुष्ठ सेवा इ. उपक्रम राबवून आपल्या संस्थेस उपक्रमशील प्रशिक्षण केंद्र बनवले. चांगले विद्यार्थी कुमुदताईंच्या विद्यालयात प्राधान्याने प्रवेश व प्रशिक्षण घेत. आज सारा कोकण त्यांचे विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक बनून शिक्षण देताना दिसतो.
 कुमुदताई प्राचार्य म्हणून रत्नागिरीस येण्याची अनेक कारणं होती, घर, शेत, वडील सांभाळणं आवश्यक झालं होतं. लांजाला काम करताना सुरू झालेले महिलाश्रम...तेथील आक्काताई तेंडुलकर, नाना वंजारेंसारखे कार्यकर्ते वडिलांप्रमाणेच थकलेले होते. साऱ्यांचा लकडा होता, भागात ये नि काम कर. कोकणच्या अनेक संस्था-कारागृह, मनोरुग्णालय, रिमांड होम, कस्तुरबा केंद्र, खारेपाटण, दापोली, जैतापूर, कसाल येथील शिक्षण संस्था, गोपुरी, कणकवली, मालवण, वेंगुर्ला येथील छोटी-मोठी कामं हाका देत राहायची. नोकरी करत हा गोफ गुंफता येईल असं वाटून, त्या रत्नागिरीत आल्या. मग त्यांनी मात्र मागे वळून पाहिलं नाही.
 प्राचार्य झाल्यावर कुमुदताईंनी स्वत:ला रत्नागिरीच्या दोन शासकीय संस्थांशी जोडून घेतलं. एक शासकीय मनोरुग्णालय. तिथं त्या समुपदेशनाचं कार्य करत. दुसरं होतं रत्नागिरीचं बाल सुधार गृह. सन १९६२ ला त्या या संस्थेच्या 'ऑनररी मॅजिस्ट्रेट' म्हणून नेमल्या गेल्या होत्या. मी विविध निमित्ताने रत्नागिरी, लांज्यास जात राही. कुमुदताईंशी भेटणं, बोलणं, चर्चा, देवाण-

निराळं जग निराळी माणसं/६८