पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

घेवाण, कधी त्यांच्या घरी राहणं, लांज्याच्या अनेक कार्यक्रमांना पाहुणा, वक्ता असं नित्याचं, जिवाभावाचं नातं निर्माण व्हायला आम्हा दोघांचं एक कार्यक्षेत्र व ध्येय, शिवाय वृत्ती साधर्म्य हेही एक महत्त्वाचं कारण होतं. माझ्या नियंत्रणावरून कुमुदताई अनेकदा कोल्हापुरी येत राहिल्या. देईल ते पुरस्कार, सन्मान त्यांनी अत्यंत नम्रपणे स्वीकारल्याचं आठवतं.
 रत्नागिरी रिमांड होमचे सेक्रेटरी डॉ. सावंत, डॉ. पानवलकर यांच्या माध्यमातून कुमुदताई भेटायच्या. शासन अनाथ, निराधार मुलं, त्यांच्या संस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष करत याबद्दल त्यांच्या मनात सतत अस्वस्थता जाणवायची. शासनाशी मतभेदपूर्ण संवाद ठेवत त्या संघर्ष करत राहायच्या. पण टोकाची भूमिका न घेता त्या आपलं मत लावून धरायच्या. शासकीय अधिकारी व यंत्रणेचा आदर ठेवत स्वत:ची स्वायत्तता व स्वातंत्र्य जपण्याचं कुमुदताईंचं कौशल्य अनुकरणीय होतं. बैठका, चर्चासत्रे इत्यादींतून व्यक्त केलेल्या विचारांत स्पष्टता असायची. क्रोध, असंतोष पण त्यांनी नेहमी गांधीवादी संयम व सभ्यतेनं व्यक्त केला. त्यांना शासनाने पुरस्कारांनी गौरवलं. पण त्यासाठी त्यांनी कधी आर्जव, अनुनय केल्याचं आठवत नाही. त्यांच्या नैतिकतेचा धाक होता व सभ्यतेची सावलीपण तितकीच आश्वासक होती.
 महिलाश्रम, लांज्याच्या कितीतरी उपक्रमात मी कुमुदताईंच्या बरोबर होतो. स्वातंत्र्यसैनिक नाना वंजारे यांच्या बहुधा अमृत महोत्सवानिमित्ताने महिलाश्रमात वृद्धाश्रम सुरू करताना की इमारत विस्तार कार्यक्रम होता. त्यांनी मला आवर्जून बोलावलं होतं. म्हणाल्या होत्या, 'मला कर्ते सुधारक हवेत. तुम्ही आलं पाहिजे.' नंतर बहुधा महिलाश्रमाचा सुवर्ण महोत्सव होता (२००७-०८)... संस्थाश्रयींचे प्रश्न मांडायला मला बोलावलं होतं. 'वेगळ्या वाटेनं जाताना...' हे त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित होणार होतं... तुम्ही बोलावं म्हटल्यावर मी आनंदानं गेलो होतो. कधी मुलीचं लग्न, कधी शासकीय अधिकाऱ्यांकडे संस्थेचा प्रश्न मांडायचा असायचा... त्यांचा फोन, निरोप, पत्र मला पुरेसं होतं... या सर्व काळात म्हणजे सन १९८० पासून ते रत्नागिरीचा निरोप घेऊन पुण्यास स्थायिक होण्यासाठी परवा वर्षा-दोन वर्षांपूर्वी जाईपर्यंत... त्या समारंभाचा पाहुणा परत मीच होतो... पण कुमुदताईंना आता बोलणं, स्मरण करणं सर्वच हरवलेल्या कुमुदताईंना त्या दिवशी निरोप देणं जिवावर आलं होतं...मला...सर्वांनाच!
 मला आठवतं, कुमुदताईंनी लांज्याला मुला-मुलींचं बालगृह, निरीक्षण गृह, वर्किंग वुमन हॉस्टेल, वृद्धाश्रम, होम फॉर डेस्टिट्यूट अशा संस्थांची दालनं सामाजिक गरज म्हणून सुरू केली; पण त्या समाज गरज म्हणून...अनुदान

निराळं जग निराळी माणसं/६९