पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पंचक्रोशीत आल्या की, मावशींचं दर्शन हा सर्वांचा ठरलेला एककलमी कार्यक्रम. मुलं, मुली हा मावशीच्या आयुष्याचा हळवा कोपरा असायचा. व्यक्तिगत आयुष्याची पोकळी हे त्याचं मूळ असलं, तरी ते त्यांनी कधी दाखवलं नाही की उच्चारलं नाही. संस्थेत बाळ आलं की, त्यांचं शी - शू, अंगडे- टोपडे, दूध सारं व्यक्तिशः करताना मातृत्वाचा झरा अखंड वाहात राहायचा. या कामातून त्यांना एक उपजत शहाणपण आलं होतं. झालं असं की देवरूखात एकदा मोठी डोळ्यांची साथ आली. ड्रॉप्स, ऍम्प्युल्सचा सर्वत्र तुटवडा होता. आश्रमात मुलींचे डोळे आलेले. बाळंतिणी धास्तावलेल्या. मावशी बाळंतिणींना म्हणाल्या, "घाबरू नका. अंगावरचे थेंबभर दूध बाळांच्या डोळ्यांत दोन-तीनदा थेंब थेंब घाला. डोळे येणार नाही.' अन् साथ आलीच नाही दवाखान्यात. स्वयंपाकात तीच हुशारी. अन्न वाढवायला लागलं तरी चव बदलू न द्यायचं कौशल्य मावशींकडून शिकावं. त्यांच्या हाताची चव मायेची असायची खरी!
 मावशींना रेडिओ ऐकायचा नाद होता. त्या बातम्याही न चुकता ऐकत. इकडे सकाळचा चहा-नाश्ता होत राहायचा. तिकडे साडेआठच्या बातम्या ऐकून त्या उठल्या की सर्वांची न्याहरी संपली समजायचं. कुणी आलं नाही ते लक्षातही असायचं. त्याच्या वाटणीचं झाकून ठेवून निरोप देऊन रिकाम्या. ही असायची घार काळजी. पिल्लं उपाशी राहू नये. वाचायची आवड त्यांना नवऱ्यानं लावली. मालक पुरोगामी विचारांचे होते. रघुनाथ हळबे कंपनीत अधिकारी होते. होते मोठे हौशी. बालगंधर्वांची नाटके दाखवायला इंदिराबाईंना घेऊन जात. नवी पुस्तके आणत, वाचत, वाचून दाखवत. मावशींनी पुढे हा छंद नवऱ्याची आठवण म्हणून जपला. संस्थेतल्या मुला-मुलींना वाचन संस्कार देण्यासाठी त्यांनी ग्रंथालय विकसित केलं होतं. अशोक लोटणकर म्हणून एक मुलगा वसतिगृहात होता. त्याला लिहायचा छंद. मावशींनी वाचलं अन् पेपरात पाठवायला सुचवलं. आलं छापून. तो पुढे लेखक झाला. अधिकारी झाला; पण श्रेय सारं मावशींचं! उपजत गुण हेरून प्रोत्साहन देण्याचा उदारपणा नि द्रष्टेपण मावशींमध्ये होता. अन्य संस्थांनाही त्यांचा मदतीचा हात सतत पुढे नि सढळ असायचा. सावंतवाडीत शासकीय महिला स्वीकारगृह होतं. काही अडचणींमुळे सन १९६४ ला शासनास काही काळ बंद करावं लागलं. मावशींनी तिथली १०-१२ मुलं, महिला आणल्या आणि सांभाळल्या. अनुदान, खर्च असला व्यवहारी हिशेब कधी त्यांच्या डोक्यातच आला नाही.
 मावशींकडे वेगवेगळे रुग्ण यायचे. संस्थेचे डॉक्टर ऑपरेशनचा सल्ला द्यायचे. मावशींचे तीन प्रश्न ठरलेले असायचे गरज आहे का? का केलं

निराळं जग निराळी माणसं/६३