पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आपण हातभार लावला पाहिजे. कोरगावकर ट्रस्ट, वालावलकर ट्रस्ट, सर दोराबजी टाटा ट्रस्ट, शासन सर्वांनी त्यांना सहाय्य केलं. त्या नेहमी म्हणायच्या. 'माणसांनी आपल्या पलीकडे जाऊन एक तरी काम केलं, तर समाजात प्रश्न राहणार नाही'. या साध्या ध्येयावर त्या आयुष्यभर अविचल उभ्या राहिल्या. त्यांना 'दलितमित्र', 'सावित्रीबाई फुले पुरस्कार', 'चतुरंग', मुंबईचा 'जीवन गौरव' लाभला; पण त्यांच्या कृतीकार्यात कधी कुणाला फरक दिसला नाही. संस्थेतील मुलींची लग्नं, मुलांच्या पुनर्वसनासाठी शेती सारं त्या रोज नवं करत राहायच्या. ४० खाटांचं हॉस्पिटल, ऍम्ब्युलन्स, डॉक्टर, नर्स, मेडिकल शॉप इ. द्वारे त्यांनी दुर्गम भागातील स्त्रियांच्या आरोग्य, प्रसूती, उपचाराची काळजी सतत वाहिली. शिवाय संस्थेत कार्यकर्त्यांचं येणे-जाणं, भाषणे, कार्यक्रम नित्य असायचे. मावशी चूल व मूल सांभाळत घरासारखी संस्था सांभाळायच्या. त्या कधी स्टेजवर चढल्याचं कुणी पाहिले नाही. अशी निरपेक्षता, निरिच्छता हेच त्यांच्या कार्याचं समवायी साधेपण होतं.
 माझा मातृमंदिर नि मावशींचा संबंध सन १९८५-८६ दरम्यान झाला. मी त्या वेळी वालावलकर ट्रस्टचे काम पाहात होतो. डॉ. महेंद्र, भाऊ नारकर, शांताबाई नारकर इ. मातृमंदिरात सक्रिय होते. संस्थेच्या अनुदान, मान्यतेचा प्रश्न होता. मी मध्यवर्ती संस्थेचंही काम पाहात होतो. तेव्हा प्रथम एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मी मातृमंदिर पाहिलं. तेव्हा मावशी थकलेल्या असल्या तरी सारं पाहात राहायच्या. मग एकदा त्यांच्या संस्थेतील दहा-एक मुली दहावी पास झालेल्या एकदम. संस्थेतील मुदत संपलेली... मग आम्ही त्यांना आमच्या कोल्हापूरच्या बालकल्याण संकुलाच्या आधारगृहात प्रवेश देऊन शिकवलं. काहींची नंतर लग्नही केली...झाली. विजय सराटे नावाच्या मुलाला एम.एस.डब्ल्यू. केलं. आनंदी, मेघा, मीना अशा कितीतरी मुली मला आजही आठवतात. विजय तर संस्थेचा संचालक होऊन अनाथाश्रम, वर्किंग वुमन्स हॉस्टेल चालवताना पाहतो तेव्हा मावशी आठवल्याशिवाय राहात नाहीत. या सर्वांना मजकडे पाठवताना म्हणाल्या होत्या, 'सर, तुम्हाला मी काही सांगायला नको...तुम्ही असेच मोठे झालात'. मावशी मितभाषी; पण मार्मिकता होती त्यांच्या बोलण्यात, संयम असायचा. पाठीवर घालून पुढे न्यायचं धोरण असायचं. कोणी मुलांबद्दल तक्रार करू लागलं तर म्हणायच्या, "मुलंच ती. मुलांसारखीच राहणार. मनावर नका घेऊ."
 संस्थेत शिकून, नोकरी करून मोठ्या झालेल्या किती तरी मुलींचं राजेवाड्यातलं हे मावशींचं साम्यकुल खरं मातृमंदिर नि माहेर होतं. मुली घरी,

निराळं जग निराळी माणसं/६२