पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भयमुक्त बाल्याचा किमयागार : संजय हळदीकर

 "भयशून्य चित्त जेथ, सदैव उन्नत माथा,

 मुक्त अशा स्वर्गातच होवो मम जागृत देश आता"
 कविवर्य गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी या ओळी लिहिल्या, तेव्हा आपला देश पारतंत्र्यात होता. भारताला स्वातंत्र्य मिळून, चौसष्ट वर्षे होत आली. हे वर्ष गुरुदेव रवींद्रनाथांच्या सुवर्ण जयंतीचं. इतक्या प्रवासानंतर तरी हा देश भयशून्य झाला का? मुक्त असा स्वर्ग इथे शक्य आहे का? हा देश जागृत झाला आहे का? रवींद्रनाथांच्या कविता वाचताना असे प्रश्न सारखे निर्माण होतात, तसेच ग्रेसच्या कविता वाचतानाही...'भय इथले संपत नाही...' हा भय-प्रदेश इथल्या मुलांच्याबाबतीत तरी खराच म्हणायचा!
 संजय हळदीकर नावाचे एक मूलतः नाट्यकर्मी असलेले गृहस्थ; पण गेली अनेक वर्षे महाराष्ट्र पालथा घालत आहेत... त्यांचा ध्यास एकच, मुलं! त्याचं बाल्य, त्यांचं भावविश्व...त्यांचं मन...त्यातली घालमेल...सारं जाणून घेण्याचा प्रयत्न ते करत आहेत. मुलं तरी कुठली? भल्या घरातली, सुजाण, सुखवस्तू पालकांची नाहीत. वाडी-वस्ती, आश्रमशाळा, सुधारगृहं, रिमांड होम, अनाथाश्रम, वसतिगृहात राहणारी! आई-वडील नसलेली, निराधार, टाकून सोडून दिलेली... भटके, विमुक्त, कुष्ठ, देवदासी, वेश्या, आई-बापांची, कैद्यांची...वंचित बालकांच्या किती परी सांगाव्यात? वंचित मुलं केवळ संस्थांत नाही असत, ती भरल्या घरातही असतात, ती जिथं, जशी असतात तिथं संजय हळदीकर जातात. अशी मुलं, संस्था त्यांना कटाक्षात कळतात.

निराळं जग निराळी माणसं/१४३