पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मग ते मुलांचं भावविश्व समजून घ्यायचा फॉर्म (प्रकार) निश्चित करतात. प्रथम संवाद, खेळ, गप्पा-गोष्टी, गाणी, मग कथाकथन...नकला...नृत्य! मग प्रश्नोत्तरं...कधी नाटक, कधी कविता, कधी चित्रं, कागद काम...साच्यांतून ते मुलांना खुलवतात...फुलवतात...बोलतं करतात. संजय हळदीकरांमध्ये मुलांत चैतन्यांची सळसळ निर्माण करणारा एक किमयागार दडला आहे.
 एकदा त्यांनी भीती आणि भिंतीच्या संबंधाचा शोध घ्यायचं ठरवलं. त्याचं कारणही तसंच होतं. त्यांनी मुंबई, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यातील रिमांड होमना भेटी दिल्या. संस्था मुलांची; पण इमारती तुरुंगाच्या. 'बच्चों का जेल' अशीच सारी स्थिती. त्यांनी पाहिलं, मुलं सारी भेदरलेली...निस्तेज, मूक, हाताची घडी तोंडावर बोट, एक साथ नमस्ते, एका छापाचे गणपती सर्व! प्रत्येक मूल स्वतंत्र हवं...इथं सारे एक...एकाला झाकावं, दुसऱ्याला काढावं तर तोच. त्यांना या साऱ्या संस्था भय-छावण्या वाटल्या. त्यांनी भीती आणि भिंतीचा अभ्यास करायचं ठरवलं. फॉर्म होता कविता. मुलांना कुणाकुणाची भीती वाटत होती? भूत, साप, पाल, झुरळंच नाहीतर आई, बाबा, शिक्षक, अभ्यास, संस्थेतले साहेब, कर्मचारी यांची पण त्यांना भीती होती. असे दिसून आले. मग त्यांनी मुलांकडून एक प्रश्नावलीच भरून घेतली. हेतू असा होता की, मुलांचं मन समजून घ्यायचं. उत्तरं धक्का देणारी होती. शिक्षकांपेक्षा टी.व्ही., मोबाईल, पुस्तकांचा प्रभाव मोठा. मुलींनी जुही चावलापेक्षा कल्पना चावलाला दिलेली पसंती नवी दिशा दाखविते. अभ्यास, परीक्षांचं भय, ओझं वागवणारी मुलं...स्वप्नातही त्यांचा पाठलाग सोडत नाहीत.
 हे सगळं अभ्यासून संजय हळदीकर या संस्थांत नाट्यशिबिरं, अभिनय शाळा भरवतात. संस्थेत नाटकाला आवश्यक असणारं काहीच नसतं (मुलांच्या संस्था असल्या तरी!) रंगमंच, वाद्यं, पोशाख, पडदे काही नसतं. मग हाती येते कोपऱ्यात असलेली केरसुणी (किंवा फुलासारखा झाडू) मुलं माणसाचे (खरंतर पालक, शिक्षकांचे) बाप असतात. त्यांच्या कल्पनांचं क्षितिज कोणीच गाठू शकत नाही. मुलांना त्या केरसुणीचा उपयोग करून मूक अभिनय करायला सांगितल्यावर मुलांच्या लेखी तो केरसुणी आणि झाडू काय काय नाही बनत?...आरसा, रिमोट, बॅट, तलवार, चाकू, पंखा, चवर, पाठ खाजवणं आणि बरंच काही. संजय हळदीकर मुलांच्या मनातल्या आपण उभ्या केलेल्या चीन-बर्लिनच्या भिंती पाडतात...भीती घालवतात आणि मुलं 'मुलं' होतात.

निराळं जग निराळी माणसं/१४४