पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कार्यकर्त्यांच्या बैठकीत एकदा त्याला संगीतानं ऐकलं... (पाहणं शक्य नव्हतं) त्याची तडफ, जिद्द अनुभवली... भारत तिला समदु:खी, समानशील वाटला... तिनं त्याच्या खांद्याला खांदा लावून काम करायला सुरुवात केली... तिच्यातही तडफ आली ...अधिकारी, पदाधिकाऱ्यांकडे पाच-सहा जणांनी मिळून जायचं... अर्ज, विनंत्या, मिनतवाऱ्या सर्व करायचं... शेवटी संगीतानं बोलायचं असं ठरलेलं असायचं... संगीता वर्मावर बोट ठेवत बोलायची... काम फत्ते व्हायचं... अनेकांना दृष्टिलाभ जरी झाला नाहीतर अर्थलाभ ठरलेला... अगोदर इतरांना नोकऱ्या दिल्या मग भारत... संगीताने घेतल्या. याला म्हणायचं कार्य... कार्यकर्ता... असं द्रष्टे नेतृत्व भारतास लाभलं, तर अण्णा हजारेंना लोकपाल विधेयकास उपोषण करावं लागलं नसतं ना?
 संगीतात तडफ यायचंही कारण होतं. तिनं पंचवीस वर्षं आपल्या डोळ्यांनी सारं जग पाहिलं, अनुभवलं होतं... सुशिक्षित, धडधाकट संगीता आपल्या सुझुकीवरून जाताना ट्रकला धडकली... क्षणात सारं जग अंधारून गेलं... दृष्टी गेली तशी ती हबकली... तिनं बोलणं, फिरणं, भेटणं सोडलं नि स्वत:ला घरात कोंडून घेऊ लागली. सुदैवानं तिचे आई-वडील प्राथमिक शिक्षक... तिची मोठी बहीण सुनीता पोलिओग्रस्त... आई-वडिलांनी तिला सुनीताकडे बोट दाखवत निराशेच्या गुहेतून बाहेर काढलं... त्यालाही एक सकारात्मक पार्श्वभूमी होती. अपघात होण्यापूर्वी बी.ए., बी.एड्., एम.ए. झालेली संगीता... नोकरी मिळत नाही म्हणून अहमदनगरच्या राष्ट्रीय अंध कल्याण संस्थेत टंकलेखक म्हणून कार्य करायची... पगारापेक्षा अनुभव, समाजसेवा हे उद्दिष्ट होतं... अन् आता तर तीच अंध झालेली, नगरच्या नॅबचे ऍड. बी. एफ. चूडीवाल यांनी तिला धीर दिला... संधी दिली... तिनं ब्रेलमध्ये डी.एड. केलं. तिला श्रीरामपूरच्या विनाअनुदानित अंधशाळेत शिक्षिकेची नोकरी भेटली. पण संगीताला आत्मविश्वास असा येत नव्हता... वादळानं उभं डोलणारं झाड उन्मळावं तसं तिचं झालं होतं... याच काळात ती नॅशनल फेडरेशन ऑफ ब्लाइंडमध्ये दाखल झाली. तिथं तिच्यासारखीच शुभदा तिला भेटली...संगीतानं तिचं स्वावलंबन हेरलं... ताडलं... Yes... I can... अन् मग तिचं सारं मळभ क्षणात दूर झालं... ती तेजस्विनी बनली... भारत भेटला... त्या परिसस्पर्शानं तिचं खरं सोनं झालं.
 कधी कोल्हापुरात याल तेव्हा राधानगरी रोडवरील साने गुरुजी वसाहतीशेजारी आहे राजोपाध्येनगर आहे. तिथं आहे एक महादेव मंदिर... थोडं पुढे आलात की एक बोर्ड वाचाल... कस्तुरबा गांधी अंध वसतिगृह... संगणक साक्षर असाल, तर घरबसल्या भारत-संगीताचा संसार पाहू शकाल...

निराळं जग निराळी माणसं/१४०