पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

फक्त www.kasturbagandhi.org वर क्लिक करा की झालं... पण हे सहज घडलं नाही... आजही ते सहज घडत नाही... रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अशीच स्थिती असते. लग्न करताना भारत-संगीताने ठरवलं होतं की, 'अंधांचं स्वराज्य' निर्माण करायचं... दोघांना नोकऱ्या होत्या... तुमच्यापैकी किती जणांना हे माहीत आहे? शासन अंधांच्या आरक्षणाचे जे ढोल-नगारे पिटते ते किती फोल आहेत... अंध शिक्षकांना सर्व शिक्षा अभियानात नोक-या दिल्या... त्या दोन प्रकारच्या. एक विशेष शिक्षक (रिसोर्स टीचर) व दुसरी फिरता शिक्षक (मोबाईल टीचर). एका शाळेत आठपेक्षा अधिक अंध विद्यार्थी असतील तर तिथं एक विशेष शिक्षक नेमला जातो. ज्या शाळांत ८ पेक्षा कमी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी नेमला जातो तो फिरता शिक्षक. त्या शिक्षकांनी ८ शाळांत (विद्यार्थी असतील तर आठ ठिकाणी जाऊन शिकवायचं. मेरा भारत महान!) या सर्वांत कडी म्हणजे आपल्या मायबाप सरकारने आपल्या सुपीक डोक्यातून अंध शिक्षकांसाठी नोकरीची नवी कॅटॅगरीच शोधून काढली आहे. शासकीय साऱ्या नोकऱ्या एकतर हंगामी (टेंपररी) असतात किंवा कायम (परमनंट). शासनाने अंध शिक्षकांसाठी एक नवी कॅटेगरी तयार केलीय. तिचं नाव आहे कायम हंगामी (परमनंट टेंपररी)...(यासाठी शासनाला वर्ल्ड कपच द्यायला हवा... किंवा गिनिज नोंद... किंवा आजवरच्या सर्व पंतप्रधानांना संयुक्त भारतरत्न!) भारत आणि संगीताला अशा नोकऱ्या असतात त्यांनी स्वत:ला (खरं तर स्वत:च्या जिद्दीला) गहाण टाकून दहा लाखाचं घर (बंगला बांधला... इक बंगला बने न्यारा... ऐकून) विकत घेतलं. बचतीचे अडीच लाख एकरकमी भरले... आता पाच हजार हप्ता जातो... हॉल, बेडरूम, स्वयंपाकघर, संडास, बाथरुम... वन बीएचके हाउस! आपल्यासारखं मनात आणलं असतं, तर त्यांना राजा-राणीचा संसार करणं शक्य होतं; पण नाही...आपण अंध म्हणून जे भोगलं ते नव्या अंध पिढीस नाही भोगू द्यायचं... एक दोन करत संगीता सोळा अंध मुला-मुलींचा सांभाळ करते. गेल्या वर्षी भारतच्या शाळेतली मुलं कमी झाली...तो 'परमनंट टेंपररीच' होता... नोकरी गेली. त्यानं जिद्द नाही सोडली. नेटवर एमकेसीएलची जाहिरात कळाली. अर्ज केला. नोकरी मिळाली. भारत आता शासकीय अंध निवासी शाळेचा प्राचार्य व अधीक्षक आहे. तिथं तो २५ अंध मुला-मुलींचा पालक, अधिकारी... हाताखाली १८ कर्मचारी असं मोठं कुटुंब तोही सांभाळतो... २३०० रुपयांनी नोकरी सुरू करणारा भारत २३,००० रुपये मिळवतो... संगीता १५,००० कमावते... दोघांचा खर्च तीन हजार दरमहा. ३५,००० खर्चात भारत संगीता २५ अंध मुला-मुलींचा सांभाळ

निराळं जग निराळी माणसं/१४१