पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वृद्ध सेवक : शिवाजी पाटोळे

 तुमच्या वाट्यास उपेक्षित बाल्य आलं तर नंतर येणाच्या तारुण्याच्या जोरावर तुम्ही आपलं भविष्य उज्ज्वल करू शकता; पण जर का तुमच्या वाट्यास उपेक्षित वृद्धत्व आलं, तर मात्र वाहतं प्रेत म्हणून जगण्याची नामुष्की येते. म्हणून बाबा आमटेंनी वृद्धत्वास 'रेफ्रिजरेटर' म्हटलं होतं. नको असलेल्या वस्तूंना मृतप्राय जगवण्याचं साधन! वृद्धाश्रमात गेलं की, हे मला आठवत राहतं. १९९० च्या दरम्यान मी 'स्त्री आधारगृह' चालवायचो. तेव्हा अनेक वृद्ध स्त्रिया यायच्या. मी लहानपणी पंढरपूरच्या वा. बा. नवरंगे बालकाश्रमात होतो, तिथं रेस्क्यू होम होतं. त्यात ही परित्यक्ता, वृद्ध, वेड्या, मुक्या, सगळ्या स्त्रिया ओसरीवर पापड वाळत घातल्याप्रमाणे आपलं जगणं वातड करत पिचत पडलेल्या असायच्या. वेळ काढणं काय असतं, हे मी माझ्या मानलेल्या आईस तिच्या वृद्धावस्थेत घरी आणल्यावर पाहिलं आहे. तिचा छंद होता, वाण्याच्या दुकानातून आणलेल्या सामानाच्या दोऱ्याचा गुंता सोडवत बसण्याचा. आयुष्यात तुम्हाला पर्याय नाही देता आले की, एकतर तुम्हाला वेडं व्हावं लागतं, नाही तर अडगळ, जळमट म्हणून जगावं लागतं! असं जीवन ज्यांच्या वाट्यास येतं त्यांचं वेदनामय वर्तमान पदरात घ्यायचं अन् त्यांना आश्वासक भविष्य द्यायचं काम करणारा माझा बालमित्र शिवाजी पाटोळे आपल्या आई, बायको, मुलं, जावई, नातवंडांसह समाजाच्या कृतघ्नपणास अत्यंत कष्टाने, कृतज्ञता भावाने माणसाळतो आहे.
 शिवाजीचा 'मातोश्री वृद्धाश्रम' सुरू झाल्याचा प्रसंग मला आठवतो. कोल्हापूरच्या बालकल्याण संकुलात संस्थांमागून संस्था स्थापन करायचा

निराळं जग निराळी माणसं/११७