पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आमचा सपाटा चालू असताना एक दिवस शिवाजी संकुलात आला नि "आपणही 'निराधार वृद्धाश्रम व अनाथ बाल शिक्षण संकुल' सुरू करतोय... तुमच्याकडे प्रवेश देऊ न शकणा-यांना माझ्याकडे पाठवा...मी सांभाळीन" म्हणून सांगून गेला. त्यानंतर काही दिवसातच आमच्याकडे एका उच्च अधिकाऱ्याने वय वर्षे ९६ असणारे आपले वडील सांभाळणार का, म्हणून विचारणा केली...मी शिवाजीकडे त्यांना दिलं अन् त्याचं काम सुरू झालं. ही १९९५ ची गोष्ट. अवघ्या दोन शेडवजा खोल्या. एका खोलीत त्या अधिकाऱ्याचे वृद्ध स्वातंत्र्यसैनिक असलेले वडील भागवत राहायचे...मी पाठवलेले...शेजारच्या खोलीत त्या शिवाजी सहकुटुंब राहून आपली दीड-दोन एकर शेती त्यांची सेवा सुश्रूषा करायचा. हा लेख लिहायचा म्हणून शिवाजीला भेटण्यास गेलो...त्या दीड दोन एकरांत आता पाय ठेवायला जागा नाही. वृद्ध निवास, भोजनालय, हॉस्पिटल, जिम्नॅशियम, ग्रंथालय, ध्यान मंदिर, अशा टोलेजंग इमारती...१३० वृद्ध आजी-आजोबांचं अन् शिवाजीच्या १७ जणांचं कुटुंब मिळून सुमारे 'दीडशे माणसांचं घर...'
 घर असल्यानं एकही नोकर नाही...आख्खं पाटोळे कुटुंब या साऱ्यांच सारं करतं...सारं म्हणजे सारं...शी-शू बिछाना बदलणं, धुणं, आंघोळ, मसाज, कपडे बदलणं, धुणं, उपचार, औषध, जेवण, गप्पा, हवं नको पाहणं...हे सारं मोफत...
 शिवाजी मागणारा गृहस्थ नाही...तो कष्टाचा पक्का...कठोर सेवाव्रती...मी सकाळी नऊला भेटायला गेलो, तर हा तीन मजली इमारत झाडत घामाघूम झालेला. सकाळी पाच ग्लास पाणी पिऊन याचा दिनक्रम सुरू होतो. मग सात वाजता सर्वांबरोबर (म्हणजे सर्व वृद्धांना देऊन) चहा, आठ वाजता नाश्ता, अकरा वाजता गरम, गरम ताजं सकस जेवण, सायंकाळी चारला चहा. परत रात्री आठला जेवण... सणवार असतातच. शिवाय फिरायची मुभा. आपला जीव गुंतलेली माणसं वजा जाता सारं आलबेल.
 शिवाजी सांगत होता...घरोघरी शिक्षण आलं...शिक्षणामागून पैसा आला. पैशानं माणसास अप्पलपोटी बनवलं...शिवाय माणसाला काम न करायचा कॅन्सर झाला...घरोघरी वृद्ध आजारी का? तर त्यांना पोटालाच घातलं जात नाही...का? तर शी-शू काढावी लागते. आपण हे लक्षात घ्यायला हवं की, म्हातारपण हे फिरून आलेलं बालपण असतं...दात नाही, कान नाही, डोळे नाही, ताकद नाही...मुलासारखं पराधीन...आई-वडील म्हातारे झाले की ते

निराळं जग निराळी माणसं/११८