पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हा पुरावा! इथली मुलं शेजारच्या शाळेत घेतली जात नाहीत. खरं तर एका एवढ्याच कारणासाठी अशा शाळा, कॉलेजिसची मान्यता, अनुदान रद्द केली पाहिजे. डोकं किती ठिकाणी व रोज आपटायचं? (शेवटी डोकं, कपाळ, आपलंच फुटत राहणार) म्हणून त्यांनी जिल्हाधिका-यांच्या मदतीनं केंद्र शासनाच्या एका योजनेतून 'महात्मा फुले हंगामी केंद्र शाळा' सुरू केली. त्या शाळेस पहिली ते आठवीची मान्यता आहे. आठवी झालेल्या मुला-मुलींनी कुठं जायचं, हा प्रश्न आहेच. त्यासाठी मंगलताई एड्सबाधितांची शाळा स्वतंत्रपणे सुरू करण्याच्या खटपटीत आहेत. वेश्या, देवदासी, कुष्ठपीडित, एड्सग्रस्तांच्या मुला-मुलींची स्वतंत्र वसतिगृह, शाळा हा समाजावरचा कलंक म्हणून जोवर आपण त्याकडे पाहणार नाही, तोवर समाज प्रगल्भ होणार नाही. जपानमधील नॉर्मलायझेशन, अमेरिकेतील ऍफर्मेटिव्ह ऍक्शनच्या धर्तीवर अनाथ, उपेक्षित, अस्पृश्य, अपंग, अंध यांच्या विकासाचा एकत्रित, समन्वित कार्यक्रम, प्रकल्प, (होलीस्टिक प्रोजेक्ट) राबवणार नाही, तोवर आपला समाज दुभंगलेलाच राहणार.
 मंगलाताई शहांच्या मनात हे शल्य असलं तरी त्या थांबलेल्या नाहीत. 'प्राप्त काल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात खोदा' गुणगुणत त्यांचे समाज प्रबोधन कार्य सुरू आहे. सोबत आपली कन्या डिंपलला घेऊन त्या काम करतात. त्यांचं स्वप्न आहे, एड्सबाधितांना सन्मानपूर्वक जगता येणारं जग निर्माण करायचं. त्या यथाशक्ती रोज उपक्रमांची भर घालत पुढे जात आहेत. पालवी प्रकल्पात त्या एचआयव्ही पॉझिटिव्ह व एड्सग्रस्त मुले, मुली व महिलांचे संगोपन, संस्कार, शिक्षण, पुनर्वसन करतात. प्रबोधन कार्याबरोबर नियंत्रण कार्य करतात. एड्सप्रतिबंधासाठी उपचार केंद्र आहे, शिक्षण वंचित बालकांसाठी शाळाही त्या चालवतात. महिन्याचा एक लाख रुपये खर्च असलेल्या पसाऱ्यात अवघे २५,००० रुपये मिळणारे अनुदान रोज युद्धाचा प्रसंग उभा करत राहते. वाडी-वस्तीत जाऊन संस्कार केंद्र, अंगणवाडी चालवायचाही त्यांचा प्रयत्न असतो; पण बळ अपुरं पडतं. तरी त्या हिंमत नाही हरत...
 गेल्या तीन दशकांच्या सततच्या कार्यानं त्यांचं असं जीवन तत्त्वज्ञान विकसित झालं आहे. सामाजिक काम म्हणजे देणं असा चॅरिटी शो त्यांना मान्य नाही. काही उभारणं म्हणजे करणं. मनुष्य संबंधांची वीण छोटे-छोटे गुंते, तिढे सोडवण्यातून घालता येते, असा त्यांचा विश्वास आहे. माणूस अन्न, वस्त्र, निवारा इ. साठी आसुसलेला असतो. ती त्याची मूळ गरज खरी; पण तेवढ्यानं त्यांचं जीवन ग्रहण सुटत नाही. 'दे दान सुटे गिरान' (ग्रहण) म्हणत

निराळं जग निराळी माणसं/१०४