पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रश्न सुटले असते तर...पण ते सोपं नसतं...माणसाला 'घर' हवं असतं. कोणतीही संस्था घर करणं म्हणजे समाज उभारणं, जोडणं, नाती निर्माण करणं महत्त्वाचं. ते त्या करतात. अनेक संस्थांमध्ये लाभार्थी, गरजू असतात...संस्थेत 'माणूस' असला पाहिजे, असा त्यांचा आग्रह असतो. त्यासाठी मानसिकता बदलायला हवी. मागे काही वर्षांपूर्वी सोलापूरच्या ब्रह्मदेव माने प्रतिष्ठानने मला राजर्षी शाहू सामाजिक कृतज्ञता पुरस्कार दिला. तेव्हा मंगलाताईंचा सत्कार करण्यात आला होता. तेव्हा त्या म्हणाल्या होत्या, 'सत्कार करून कार्य पुढे नाही जात. सत्कार्यात भागिदारी हवी' ते खरं होतंही आणि आहे.
 हिंदीतील प्रख्यात कवी रामनरेश त्रिपाठींची कविता 'अन्वेषण' (शोध) मी पूर्वी शिक्षक असताना शिकवत असे. त्यात कवी जगरहाटीविरूद्ध असणारं देवपण, सौंदर्य, इतिहास, भक्ती, दया, विरक्ती असं बरंच काही सांगतो. माणसं देव दगड, धोंडे, जंगल, बागेत शोधत असतात. तेव्हा तो गरिबांच्या झोपडीत विसावलेला असतो...असं उदाहरणासह सारं जीवन समजावतो... मंगलाताई शहांचे जीवन हे एक अर्थाने जगरहाटी, वहिवाटीविरूद्ध चालायची बिकट वाट आहे. ती त्यांनी अंतरीच्या उमाळ्याने स्वीकारली. त्यामुळे त्या कधी कुणाविरूद्ध तक्रार नाही करत. प्रश्न आहेत म्हणून तर आपण आहोत, असं त्या मानतात व जमेल तेवढे करत राहतात. त्या आस्तिक आहेत की नाही माहीत नाही; पण त्यांच्या बोलण्या-चालण्यात आस्थेचा प्रत्यय मी नेहमी अनुभवत आहे. त्यांचं सारं जीवन कार्य रामनरेश त्रिपाठींच्याच ओळीत सांगायचं तर-
 कठिनाइयों, दुखों का,

 इतिहास ही सुयश है |

 मुझको समर्थ कर तू,

 बस कष्ट के सहन में ||

•••

निराळं जग निराळी माणसं/१०५