Jump to content

पान:नित्यनेमावली.pdf/४०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(३)

उठोनिया प्रातःकाळीं । वेगें जाऊ राउळासी ।
जळतिल पातकांच्या राशी । काकडआरती देखिल्या
उठा उठा हो साधुजन । साधा आपुलालें हित ।
गेला गेला नरदेह | मग कैंचा भगवंत
उठोनिया पहाटे । विठोबा पाहूं बा नीट |
चरण तयाचे अमोलिक | अवलोकूं दृष्टीं या
जागे करा रुक्मिणीवरा । देव निजले निजमंदिरां ।
वेगीं निंबलोण करा | दृष्ट होईल तयासी
ढोल दमामें गर्जतीं । पुढें वाजंत्री वाजती ।
काकडआरती होते। पांडुरंगरायाची
सिंहशंखनादभेरो । गजर होतो महाद्वारीं ।
केशवराज विटेवरी। नामा चरणीं वंदितो

( ४ )

गुरु हा संतकुळींचा राजा | गुरु हा प्राणविसांवा माझा |
गुरुवीण देव नाहीं दुजा । पाहतां त्रिलोकीं
गुरु हा सुखाचा सागर । गुरु हा प्रेमाचा आगर ।
गुरु हा धैर्याचा डोंगर । कदा काळीं डळमळेना
गुरु हा सत्यालागीं साह्य | गुरु हा साधकासी माय ।
गुरु हा कामधेनु गाय | भक्ता घरीं दुभतसे