पान:निखळलेलं मोरपीस.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मनोगत

 'आधारवड' व 'सांगली आणि सांगलीकर' या पुस्तकानंतर प्रकाशित होणारे 'निखळलेलं मोरपीस' हे माझे तिसरे पुस्तक. पहिली दोन्ही पुस्तके अनुक्रमे चरित्र आणि चरित्राच्या अंगाने जाणारे अशा स्वरुपाची होती. प्रस्तुत पुस्तकात गेल्या १५ वर्षात दिवाळी अंकांमधून प्रसिद्ध झालेल्या माझ्या कथांपैकी २१ कथांचा समावेश करण्यात आला आहे.

 कथा हा माझा अत्यंत आवडता वाङ्‍‍मयप्रकार आहे. उत्तम कथा लिहिता याव्यात ही माझी आंतरिक तळमळ आहे. तथापि या तळमळीला भरपूर चिंतनाचे आंतरिक पाठबळ लागते. त्यात मी उणा पडत असल्याने दर्जेदार कथा- लेखनापासून अद्याप मी दूर आहे याची मला जाणीव आहे ! प्रस्तुत संग्रहातील काही कथांची निर्मिती मनाला चटका लावणाऱ्या प्रसंगांतून झाली आहे. एके काळी शांततेत राहणाऱ्या डोंबिवलीवासियांची 'बिल्डर' या जमातीने कशी फरफट केली त्याची लघुत्तम कहाणी 'आटपाट नगर होतं!' या महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या कथेत आहे. सर्वच उपनगरांची स्थिती कमी-जास्त फरकाने तशीच, विशेषतः १९७० ते १९८०च्या दशकात बनल्यामुळे, अनेक वाचकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया त्यावेळी म.टा. मध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. अशाच तऱ्हेच्या मानसिक आंदोलनांतून ‘सिद्धार्थ आणि गौतम', 'ईश्वरी शापित' अशा कथांची निर्मिती झाली आहे. १९९२च्या मार्चमध्ये मुंबईत बॉम्ब स्फोटांचे भयानक तडाखे सर्वसामान्य जनतेला सहन करावे लागले त्याचे पडसाद 'बॉम्बस्फोट' आणि 'अंधारयात्रा' या कथांमध्ये उमटले आहेत. इतिहासाचा जाज्वल्य अभिमानी असणाऱ्या एका इतिहास - पुरुषाचा माझ्यावर एका भेटीत एवढा प्रभाव पडला होता की तो अनुभव शब्दबद्ध केल्याशिवाय मला चैन पडेना; त्यातूनच ‘इतिहासाचा साक्षात्कार' या कथेचा जन्म झाला. माझ्या मित्रवर्तुळात विनोदप्रचूर संभाषण आणि सहजसुंदर कोट्या करणारा अशी माझी एक बरीवाईट प्रतिमा बनली आहे. त्यामुळे मी विनोदी कथा-लेखन करावं असा एका साहित्य-प्रेमी मित्राचा सतत आग्रह असे; त्यामुळेच 'आयता जोशी', 'पापी पोटाचा प्रश्न', 'माझी अतूट सखी - सर्दी' अशा विनोदी अंगाने जाणाऱ्या कथा मी लिहिल्या.

निखळलेलं मोरपीस / ५