Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४६
पुण्याची काँग्रेस आणि मंडपाचा वाद.

विचार होता, विशेषतः ज्या शहरी सभा भरवावयाची तेथील तरी सर्व लोकांची राष्ट्रीय सभेस सहानुभूति अवश्य पाहिजे असें त्यांचे मत होतें.
 पुण्याची स्थिति इतर शहरांहून फार निराळी. पुणे ही पेशव्यांची राजधानी. ब्राह्मण्याची पुणे ही आश्रयभूमि. जुन्या परंपरेचे, जुन्या चालीचे, जुन्या धर्मकल्पनांचे भोक्ते येथील बहुतेक लोक. या जुन्या परंपरेंतील लोकांचें असें मत पडलें कीं, जर सामाजिक परिषद् ही राष्ट्रीय सभेच्याच मंडपांत भरेल तर सर्व राष्ट्रीय सभावाले सामाजिक परिषदेच्या मताचेच आहेत असें जगजाहीर होईल. परंतु आम्हांस राजकीय अधिकार पाहिजे आहेत, आमची राजकीय सुधारणा झाली पाहिजे, धार्मिक सुधारणेंत लुडबुडण्याचें, जुन्या थोर पूर्वजांनीं घालून दिलेल्या धर्माचे बाबतींत अमुक सुधारणा करा, तमुक सुधारणा करा अशी हुल्लड उठविणारे आणि मनुयाज्ञवल्क्यांच्या पदवीस झोंबू पाहणारे जे लोक आहेत त्यांच्याशीं आम्हांस कांहीं एक कर्तव्य नाहीं; त्यांचा आमचा या विचारांत काडीचा संबंध नाहीं असें जगजाहीर करण्यासाठी दोन्ही सभा निरनिराळ्या ठिकाणीं भरवा असे या जुन्या पक्षाच्या लोकांचें म्हणणें पडलें, आम्ही राष्ट्रीय सभेच्या कार्यासाठी वर्गणी देऊ, सामाजिक परिषदेबद्दल आमची सहानुभूति यत्किंचितही नाहीं असे हा वर्ग स्पष्टपणे म्हणे. याच्या उलट दुसरा सुधारकी पक्ष असें म्हणूं लागला कीं, जर सामाजिक परिषद् राष्ट्रीय सभेच्या मंडपांत भरू देणार असाल तरच आम्ही वर्गणी देऊ, नाहीं तर साफ देणार नाहीं. खरे पाहिलें तर राष्ट्रीय सभा सामाजिक परिषदेपेक्षां महत्त्वाची. दोन्ही गोष्टी निरनिराळ्या होत्या म्हणूनच दोहोंचीं अधिवेशनें निरनिराळीं भरत. तेव्हां केवळ राष्ट्रीय सभेसाठींच असेल तर आम्ही वर्गणी देणार नाहीं असें म्हणणाऱ्यांवर टिळक यांनी काँग्रेसचे द्रोही असा आरोप ठेविला तो रास्तच होता. जेव्हां टिळकांनी सुधारकी व अतएव सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या या चमूचें हें मतकृपणत्व पाहिलें तेव्हां त्यांनी जुन्या मताच्या लोकांस उचलून धरिलें, वास्तविक वैयक्तिक दृष्टया टिळक भांडले नसते. सामाजिक परिषद् कोठेही भरवा; त्याबद्दल त्यांनी येवढा विरोध केला नसता. परंतु आपलेच म्हणणें धरून एका प्रामाणिक पक्षाला धुडकावून लावू पाह