Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२
रानड्यांची भेट.

असें पुष्कळदा होत असे. आगरकरांविषयीं त्यांचा आदर दुणावत होता. त्यांचीं उभयतांची मतें जुळत. एकदां रानड्यांच्या जवळ सहज बोलतांना अकपट मन, सरळ हृदय, उल्हास व उत्साह, तरुणपणींचा जोम वगैरे गुण गोखल्यांत कसे आहेत याचे आगरकरांनी वर्णन केलें. न्या. रानड्यांस या तरुणास पाहण्याची इच्छा झाली. १८७० पासून १९०० पर्यंत महाराष्ट्रांत राजकीय, धार्मिक व सामाजिक चळवळ करणारे, आशेस पालवी फोडणारे, निराशेचा नायनाट करणारे न्या. रानडे हे प्रमुख होते. ते सरकारी नोकर असले तरी त्यांच्या कार्यात- लिहिण्यांत, बोलण्यांत, काँग्रेसला जाण्यांत व्यत्यय आला नाहीं. तरुणांचे ते वाटाडे झाले. त्यांना स्वतःस जो मार्ग पटला होता तो त्यांनी इतरांस दाखवून दिला. नोकरींत गुरफटून गेल्यामुळें रानड्यांस तितक्या धडाडीने व जोमाने कार्य करितां येत नसे. यासाठीं ते नवीन तरुण- मंडळीकडे दृष्टि ठेवीत. रामदास हे ज्याप्रमाणें 'चलाख आणि हुशार मुलगा दिसेल, त्याचे मन वळवून त्याला मजकडे पाठवा; त्याचा गोवा आम्ही उगवू' असें आपल्या शिष्यांस- मठाधिपतींस लिहीत- त्याप्रमाणेच रानडे हेही नवीन, जोमदार, स्वार्थत्यागी, प्रामाणिक व बुद्धिमान् तरुणांच्या शोधांत असत. आपल्यामागे देशास नेमस्तपणाचे वळण लावणारा कोणी तरी असावा असें त्यांस वाटे. आगरकरांना गोखल्यांविषयीं सांगितल्यानंतर त्यांनी ही गोष्ट लक्षांत ठेविली. एक दिवस त्यांनी आपले मित्र आबासाहेब साठे यांस गोपाळराव गोखल्यांची भेट घेण्यास सांगितले. आबासाहेबांनी भेट घेतली आणि ठरल्या दिवशीं त्यांची व रानड्यांची ओळख करून दिली. गुरूस शिष्य मिळाला. शिष्यास गुरु लाभला. 'आंतरः कोऽपि' हेतूची एकमेकांस ओळख झाली. शिष्य आनंदून घरीं गेला. गुरूचेंही मन प्रसन्न झाले. 'गोखल्यांचे पूर्ववयांतील गुरु आगरकर तर भर ज्वानींतले गुरु रानडे' रानड्यांच्या जवळ राजकारणाचे धडे घेण्यास शिष्यानें सुरुवात केली. पायरीपायरीनें गोखले शिकूं लागले. पहिल्या पहिल्यानें रानडे निरनिराळ्या उताऱ्यांचा त्यांस सारांश लिहून आणण्यास वगैरे सांगत. थोड्याच दिवसांनीं ते सार्वजनिक सभेचे सेक्रेटरी व सभेच्या त्रैमासिकाचे संपादक झाले. ते याबद्दल कांहीं एक वेतन घेत नसत.