Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३०
सोसायटीवरील संकटपरम्परा.

कर्जबाजारी झाली नाहीं. ती स्वतःच्या पायांवर उभी राहिली. त्यांस कॉलेजमधील सर्व काम झेपेना. गणितासाठीं ते शिक्षक धुंडाळू लागले, आणि मुंबईस त्यांच्याबरोबरच बी. ए. झालेले धोंडोपंत कर्वे यांस त्यांनी सोसायटीत आणले. १८९५ मध्ये सोसायटीवर फार मोठी आपत्ति कोसळली. सोसायटीवरच नाहीं तर सर्व महाराष्ट्रावर कोसळली. प्रथम इंग्रजीचे प्रख्यात शिक्षक प्रो. केळकर हे मृत्युमुखी पडले आणि दुःखें येऊ लागली म्हणजे एकदम येतात हें दाखविण्यासाठींच जणूं काय प्रि. आगरकर यांसही काळाने उचलून नेलें, उदार हृदयाचा, निष्कलंक आचरणाचा, थोर मनाचा, जबरदस्त लेखणीचा, स्वजनहितासाठी तळमळणारा, दारिद्र्याची खिजगणती न करणारा असा महापुरुष- सत्पुरुष कोणाला चटका लावून जाणार नाहीं? कोणाच्या डोळ्यांतून टिपें गळणार नाहींत? कोणाचें हृदय फाटणार नाहीं? तत्त्वासाठी सर्व सहन करणारे बुद्धिप्रधान टिळक, पण तेही रडले. टिळक बुद्धिप्रधान, तर्ककठोर; आगरकर जरी बुद्धिप्रधान, तर्कप्रधान असले तरी त्यांच्या हृदयांत ओलावा जास्त दिसे, टिळकांच्या हृदयांत जर आपण डोकावूं लागलों तर प्रथम ज्ञानाचे- बुद्धीचे खडक लागावयाचे आणि त्यांच्यावर आपण आदळावयाचे. परंतु एकादा खंबीर गडी जर हे फत्तर फोडून खाली पाहील तर त्यास सात्त्विक व कोमल वृत्तींचा झुळझुळ झरा तेथे वाहत असलेला आढळेल. आगरकरांच्या अंतःकरणांत बुद्धीच्या दरींतून प्रेमगंगा वाहत होती किंवा प्रेमाच्या दरींतून बुद्धिगंगा वाहत होती; यामुळे दोन्ही गोष्टी आपणांस ताबडतोब दिसत. आगरकरांच्या मृत्यूनें टिळकांची बुद्धि फोडून त्यांच्या अंतरंगाचा ठाव घेतला आणि ही हृदयपाताळांतील गंगा नयनांमध्ये दिसून आली. दोघे झगडले तरी तत्त्वासाठी झगडले. त्यांनी एकमेकांवर घुसून एकमेकांस जखमी केलें तरी तें स्वार्थासाठीं नव्हे तर स्वतःला प्राणाहून प्रिय वाटणाऱ्या विचारांच्या संरक्षणासाठी. त्यामुळें प्रेम हें थोडेंच सुकून जाणार? प्रेम आहे असें दाखविण्यासाठी सामान्य जनांना देवाण घेवाण करावी लागते. परंतु थोर माणसांचें तसें नसतें. दुसऱ्यावर प्रेम आहे असें त्यांस दाखवावयाचें नसतें; तें त्यांच्या अंतरीं मात्र असतें. रामतीर्थांनीं आपल्या एका