Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/२९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९२
शिष्टाचार व स्त्रीदाक्षिण्य याबद्दल गोखल्यांची आस्था.

ओपथीचा व्यवसाय करीत होता. त्याच्याजवळ गोखले योगाचा अभ्यास करण्यास जात. त्यांनी हें कोणास कळविलें नव्हतें. परंतु पुढे हें सर्व उघडकीस आले. गोखल्यांनी तो नाद सोडला. ते म्हणाले, 'मी ध्यानधारणा करूं लागलो, की इतर सर्व ध्यानें बाजूस राहून 'Visions of Blue books and Government resolutions' माझ्यापुढें दत्त म्हणून उभी राहतात.
 गोपाळरावांस ज्योतिषाचा किंवा ग्रह वगैरेंवरून भविष्य वर्तविण्याचा बराच नाद असे. खाली धारवाडकडे राहणारे 'शंकरभट ज्योतिषी' हे त्यांस नेहमीं भविष्य वर्तवून पाठवीत. त्यांनी १९११ मध्ये एक भविष्य केलें होतें. त्यांत गोपाळराव जास्तीत जास्त १९३२ पर्यंत जगतील असे होतें. १९१४-१५ मध्ये प्रकृतीस धोका आहे; १९१४ पासून पुढे देशास जास्त चांगले दिवस येतील; त्यांचा विलायतेत बोलबाला होईल वगैरे भविष्य त्यांनी केले होते. गोखलेही कधी कधी स्वतः हें ग्रहगणित वर्तवीत असत. परंतु यामुळे त्यांनी प्रयत्नांत कधी कसूर केली नाहीं. हा एक त्यांस नाद होता इतकेंच.
 हे सारे नाद गोपाळरावांस होते, परंतु घरी हिशोब वगैरे मात्र ते कधीं पहावयाचे नाहीत. हे पैसे घ्या, आणि करा काय ते असे सांगावयाचे. खिशांतून एकादे वेळेस पैसे मोजून ठेवलेले असलेच आणि कमी झाले असे आढळले तर क्वचित् चवकशी करावयाचे. एकादे वेळेस मात्र लहर लागली तर तोंडाने सर्व हिशोब जमवावयाचे आणि मग मात्र तो पैच्याही अपूर्णांकापर्यंत जमवावयाचा. थोर लोकांस कोणतीच गोष्ट क्षुल्लक वाटत नसते. जें कांहीं करावयाचें तें सर्व ते मनापासून करतात.
 शिष्टाचारास गोखले फार प्राधान्य देत. ते प्रथम इंग्लंडमध्ये गेले, तेव्हां या गोष्टीसाठी फार जपावयाचे. एकदां एका होडींत चढतांना वाच्छांनी टोपी काढली नाही म्हणून गोखले रागावले. 'तुम्हीं टोपी काढली नाहीं !' असे ते म्हणाले. म्हणूनच परकी लोकांबरोबर वागतांना ते त्यांच्याप्रमाणे चागत. बायकांस वगैरे पत्रे पाठवावयाची झाली तर इंग्लंडांत किंवा युरोपांत 'टाइप' करून पाठवीत नाहींत. तो अशिष्टाचार मानला जातो. कोणा स्त्रीस पत्र पाठवावयाचे असेल, तर तें हस्तलिखितच असावें लागतें. गोखलेही सरोजिनीबाई, बेझंट वगैरेंस स्वहस्तानें पत्रे