Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०

लिहिणाराला ही दुसरी बाजू पहाणें अत्यंत अवश्यक आहे. रा. साने यांनी दोन्ही बाजू पाहून निर्णय देण्याचा यत्न केला आहे. परंतु एका बाजूच्या मताचा त्यांच्या मनावर अतिशय पगडा बसला आहे, म्हणून म्हणा अगर दुसरी बाजू पहाण्याची सगळी साधनें त्यांना प्राप्त झाली नाहीत म्हणून म्हणा, त्यांनीं नमूद केलेल्या निर्णयांत पक्षपाताचा भाग बराच आढळतो. असे पक्षपाताचे मासले येथे थोड्या विस्ताराने दाखल केल्यास अप्रस्तुत होणार नाहीं.
 ना. रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांनी लिहिलेल्या गोखले- चरित्रांत एका ठिकाणी 'टिळकांना गोखल्यांचा मत्सर वाटत होता,' असें विधान आहे. हें विधान त्यांनी टिळकांच्या हयातीत केले होते. शिवाय त्यांचा व गोखल्यांचा निकट स्नेहसंबंध होता. या गोष्टी लक्षांत ठेवूनच त्यांच्या विधानाचा साधकबाधक विचार करावयास पाहिजे. सदर विधानावर रा. आठल्ये यांनीं आपल्या इंग्रजी टिळक-चरित्रांत प्रतिकूल टीका लिहून मत्सराच्या आरोपांतून टिळकांना दोषमुक्त केलें आहे. त्याचाच अनुवाद रा. साने यांनी केला आहे. परंतु थोड्या बारकाईने रा. आठल्ये यांच्या टीकेचा परामर्श घेतल्यास त्यांनी टिळकांच्या तरफदारीसाठी पत्करलेली तर्कपद्धति निर्दोष नसल्याचे दिसून येते. त्यांच्या टीकेचा भावार्थ असा कीं, १८८६-८७ सालांत टिळकांनीं गोखल्यांचा मत्सर करण्यासारखें गोखल्यांमध्ये कांहीं विशेष गुण नव्हते. टिळकांनी रानडे-तेलंगांविषयीं मत्सर बाळगला असता तर तें शोभणारें होतें. गोखल्यांना तेव्हां शाळेत धड शिकवितां देखील येत नव्हते; अशा व्यक्तीशी टिळकांची चुरस असणें संभवनीय नाहीं. ही विचारसरणी बऱ्याच चुकीच्या कल्पनांवर उभारली आहे. अगोदर गोखल्यांना या दिवसांत शिक्षकाचें काम नीट बजावतां येत नव्हतें, हीच कल्पना चुकीची आहे. त्यांनी मिळकत वाढविण्याकरितां न्यू इंग्लिश स्कुलांत शिक्षकाची नोकरी असतांना पब्लिक सर्व्हिसच्या परिक्षेचा वर्ग चालविला होता व त्या वर्गाच्या जोरावर त्यांना मनाजोगी किफायत होत असे, ही गोष्ट सर्वमान्य आहे. या गोष्टीमुळे त्यांनी अध्यापनकौशल्य किती जलद संपादन केलें याचा अंदाज करणें अशक्य नाहीं. याबरोबरच टिळकांची तेव्हांची स्थिति जमेस धरावी लागते.