Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/२६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६५
टिळकांनी संस्था का स्थापल्या नाहीत ?

तरी कर्ता माणूस निघाला काय? शंकराचार्याच्या पीठाची तीच रड. तेव्हां हें पाहून संस्था वगैरे स्थापण्यावर माझा विश्वास नाहीं.' टिळकांच्या या म्हणण्यांत खोल अर्थ आहे. व त्याचा त्यांच्यावर टीका करणारांनी विचार करावा. पुढे संस्था निकामी होतील म्हणून निर्माणच न करणे हे अव्यवहार्य आहे असेही पुष्कळ म्हणतील. परंतु टिळकांची वरील विचारसरणी जी आहे ती हिंदुस्तानांत तरी कठोर असली तथापि सत्य आहे. या संस्था इकडे जोमानें कां चालत नाहीत याचे एक कारण त्या वंशपरंपरागत असतात किंवा गुरु आवडत्या शिष्यास अधिकार देतो हें होय. संस्था लोकमतानुवर्ती असाव्या; त्यांस घटना असावी. म्हणजे पाश्चात्य देशांत संस्था टिकतात तशा आपणाकडेही टिकतील, यांत शंका नाहीं. रा. ब. महाजनी म्हणतात 'रामदासांनी आपले कार्य आपल्या मागें चालविण्याकरितां हिंदुस्तानभर मठांचें जाळे पसरून त्या त्या ठिकाणी महंतांची स्थापना केली. ही योजना स्वामींच्या कल्पकतेची साक्ष देते, तशी त्यांच्या दीर्घदृष्टीची देत नाही, हें कष्टानें कबूल करावं लागतें.' टिळकांना दीर्घदृष्टि होती असे म्हणणें यावरून सहजच प्राप्त होतें. पुस्तकांचा, रिपोर्टांचा, व साधनांचा संग्रह टिळकांनीही केला. 'पण ही साधनसमृद्धि बाह्य उपकरण-समृद्धि होय. ती दृढ व्यासंग नें मनांत रुजविली पाहिजे, आपलीशी केली पाहिजे. इतके झाल्यावरही विवेकानंद ज्यास देशभक्तीची दुसरी पायरी समजतात, ती उपाय- योजना, अभेद्य किल्लेकोट उभारण्याची हातोटी, हें कौशल्य 'देणें ईश्वराचे' असेंच म्हणणे प्राप्त आहे. ओढून ताणून हे येत नसतें. बांधली शिधोरी किती काळ पुरणार?
 या विवेचनावरून टिळक, 'संस्था-संस्थापक' नव्हते म्हणून त्यांस कितपत लघुत्व द्यावें हें सुज्ञ वाचकांनी आपल्या मनाशी ठरवावें. टिळकांमध्ये व्यावहारिक शहाणपणाही होता. अरविंद घोष, लजपतराय, विपिनचंद्र पाल या सर्वापेक्षां तडफ, चिकाटी, व्यावहारिक शहाणपणा, बुद्धीचा खोलपणा आणि निश्चितपणा, व केवळ उचंबळलेल्या मनोवृत्तीबरोबर वहात न जातां त्या मनोवृत्ति कार्यक्षम करून घेण्याचे सामर्थ्य, हे गुण टिळकांत जास्त असल्यामुळे साहजिकपणेच जहाल पक्षाचे नेतृत्व त्यांच्याकडे आले.
 ५.