Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/२४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४१
गोखल्यांची श्मशानयात्रा.

तारे चमकत होते. परंतु येथे जनतेच्या डोळ्यांत अश्रुंचे ढग जमत होते. गोपाळरावांचे शव खाली काढण्यांत आले. त्यांच्या सभोवती चिमणीसारखी तोंडे करून त्यांचे मित्र वगैरे बसले होते. काय करणार! मृत्यु कोणासही चुकत नाही; मृत्यु कोणाचीही गय करीत नाहीं. मरण सर्वांसच येतें; परंतु देशासाठी निरपेक्षपणे, निरलसपणे अखंड श्रम करीत असतां, तनमनधन अर्पण करीत असतां मृत्यु येणं हे महाभाग्य होय. लढाईनंतर सर्व देशाने करावयाच्या उठावणीची गोपाळराव दिशा ठरवीत होते. रॉयल कमिशनचे काम अर्धवटच राहिले, त्याची तळमळ त्यांस लागून राहिली होती. परंतु वरून संदेश आला, की जेवढी फुलं परडीत जमविली असतील तेवढी घेऊनच प्रभुच्या चरणीं यांवें. जमविलेली फुले परमेश्वराच्या चरणारविंदावर वाहण्यासाठी हा माळी निघून गेला. देवानें बोलावले; ते गेले. आपण वाईट वाटून घेण्यांत काळ न दवडतां फुलं वेचावयास लागूं व परडी भरून ठेवू. कारण देवाची हांक केव्हां येईल, याचा नेम नसतो.
 सर्वत्र तारा गेल्या. देशांत हाहाकार झाला! पुण्यांत शनिवारी दुपारी प्रेतयात्रा निघाली. आजूबाजूचे व मुंबईचे लोक आले होते. पुढारी मंडळी हजर होती. गोपाळरावांचा देह पुष्पहारांनी मंडित करून सोसायटीचे इमारतीतून बाहेर काढण्यांत आला. लकडीपुलावरून सदाशिवपेठेच्या रस्त्यानें, बुधवारांतून, नानांच्या वाड्यावरून ओंकारेश्वरी देह मिरवीत नेण्यांत आला. फर्ग्युसन कॉलेजांतील सर्व प्रोफेसर, कामत वगैरे शहरांतील प्रमुख मंडळी, टिळक, भांडारकर, सर्व लोक वाळवंटांत जमले होत. विद्यार्थ्यांची व लोकांची गर्दी लोटली होती. ओंकारेश्वरी एक दोन छायाचित्रे घेण्यांत आली. नंतर गु. डॉ. भाण्डारकर व लो० टिळक यांची समयोचित भाषणे झाली. तदनंतर गोखल्यांच्या देहास मंत्राग्नि देण्यांत आला. पुण्यालाच नव्हे तर सर्व हिंदुस्तानास चटका लावून गेलेल्या गोपाळरावांचे गुणवर्णन करीत लोक परत फिरले. टिळकांचे या वेळचे उद्गार फार स्फूर्तिदायक होते. त्यांच्या मनाच्या मोठेपणास ते शोभेसे होते. 'हिंदुस्तानांतील हिरा, महाराष्ट्रांतील नररत्न, कर्तृत्वशाली पुरुषांचा वीर गेला!' असे जे टिळकांनी सांगितले ते योग्य होते. या बोलण्यांत कपट नव्हतें. हृदयाचा सरळपणा व मनाचा उदारपणा