Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/२३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३७
आसन्नमरण गोखल्यांच्या भेटीस गांधींचे आगमन.

गैरहजेरीत आपल्या मोहऱ्यावर झालेल्या अश्लील टीकेचा सूडच ते टिळकांवर घेत आहेत असे वाटले. परंतु त्या वेळेस टिळक गैरहजर होते. ते सरकारचा पाहुणचार घेत होते; ते स्वातंत्र्यमंदिरांत- कारागृहांत होते. म्हणून आपल्या अनुयायांस आवरणें त्यांना शक्य नव्हते. परंतु या वेळेस गोखले आजारी असले तरी आपल्या अनुयायांना त्यांनी आवरले पाहिजे होते. परंतु ते त्यांच्याकडून झाले नाही असे दिसते; असो.
 महाराष्ट्रांत पुनः खडाजंगी होईल का? आतां जगांत लढाईस सुरुवात झाली आहे. अशा नाजूक प्रसंगी देशांत बंडाची प्रवृत्ति तर नाही होणार असाही त्यांस संशय आला असेल! देशाचे कसे होईल? ही नौका पैलतीराला सुरक्षित जाऊन पोहोचल, कां खडकावर आदळून शतशः विदीर्ण होईल याची त्यांस चिंता लागून राहिली असावी. ते खंगत चालले होते. अनंत श्रमांनी थकलेल्या त्यांच्या देहाला जास्तच थकवा आला. आतां त्यांस विशेष श्रम होत नसत. रात्रीच्या वेळी मनाची करमणूक व्हावी म्हणून त्यांची मित्रमंडळी पत्ते वगैरे खेळावयास जमत. हेतु हा की त्यायोगे तरी त्रासलेल्या जीवास विरंगुळा व्हावा. एक दिवस सहज खेळतांना त्यांचे आप्त दत्तोपंत वेलणकर त्यांस म्हणाले, 'ज्या पत्रामुळे येवढें रण माजून राहिले आहे तें कराना एकदा प्रसिद्ध?' तेव्हां गोखले म्हणाले, मी जर तें प्रसिद्ध केलं तर टिळकांवर जास्तच गहजब होईल. व ते जास्तच अडचणीत सांपडतील. पत्र प्रसिद्ध करावयाचें, की नाहीं ते मला समजते. तुम्हांला तितका डावपेंच, मुत्सद्देगिरी माहीत नाही. ('You have no potitical wisdom') अशा रीतीने दिवस चालले. शरीर रोडावत चालले. गोखल्यांची अंगलट साधारण बऱ्यांपैकी होती. त्यांचा वर्ण गौर असून चेहऱ्यावर एक प्रकारचे मार्दव असे. डोळ्यांत स्निग्धता व पावित्र्य असे. त्यांची मूर्ति मोहक होती; टिळकांप्रमाणे भेदक नव्हती. त्यांची रमणीय देहयष्टि आतां सुकत चालली. तेज हरपले; रक्त आटले; मांस नाहींसे झाले. अशा रीतीने गोखले शरपंजरी अमतां १२ फेब्रुवारीस गांधीजी पुण्यास आले. १९१४ मध्ये इंग्लंडमध्ये गोखले आजारी असतांनाही गांधीजी आपल्या गुरूस भेटण्यास आफ्रिकेतून तांतडीने तेथे गेले होते. गांधी पायांत कांहीं न घालता तेथे त्यांच्या भेटीस येत. परंतु गोखल्यांनी निर्वाणीने 'थंडी आहे, पायांत बूट व मोजे