Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/२२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५
अल्पसंतुष्ट गोखल्यांवर मेथादिकांची इतराजी.

पसंत नसण्याचें दुसरें कारण म्हणजे नुसता तीन पौंड डोई पट्टीचा कर बंद करणें म्हणजे कांही मोठें शतकृत्य करणें नव्हे. इतर हजारों बाबीत अन्याय सर्रहा सुरूच राहणार होता! परंतु गोखल्यांचें या बाबतींतील धोरण चांगले होते. सर्व अन्याय दूर होईपर्यंत आफ्रिकेतील आपल्या बांधवांस तुरुंगांत रखडत ठेवावयाचे कां एकेकाच्या गळ्याभोवतालचा फांस सोडवावयाचा ?मुंबईत, पुण्यांत आराम खुर्चीवरून राजकारणाच्या सव्वा हात लांब बाता झोंकणाऱ्यांस आफ्रिकेतील मजुरांस काय हालअपेष्टा भोगाव्या लागत असतील याची कल्पनाच येणे शक्य नाहीं. तुरुंगांत गेलेल्या हजारों बायकांपोरांस आधीं बाहेर तर येऊं द्या, मग पुढील प्रश्नास हात घालू. परंतु खाईन तर तुपाशीं नाहीं तर उपाशी असला मामला गोपाळरावांस पटत नसे. तेव्हां गोपाळराव तीन पौंडांची डोईपट्टी उठवूनच तात्पुरते संतुष्ट झाले. जर ते तसें करते ना, तर येवढेही झाले नसतें. साउथ सरकारने केलेल्या स्वागताने गोखले सिंघे बनले नव्हते. असा पाहुणचार करणाऱ्या सरकारास कसें दुखवूं हाही प्रश्न त्यांच्या मनांत नसावा. कांहीं असो, गोपाळरावांवर हिंदुस्तानांत पुष्कळ ठिकाण टीका झाली खरी. मेथांस गोखल्यांचा मवाळपणा व लेखी वचन न मागण्यांत झालेला गबाळेपणा हीं आवडली नाहीत. त्यांनी गोखल्यांस दोष दिला. शेवटी गोखले फसलें असेच सर्वांस वाटलें. गोखल्यांनीं लेखी वचन घेण्याचा बाणेदारपणा दाखवावयास पाहिजे होता. लेखी वचन आणूनही जर आपले अभिवचन वसाहत- सरकारने पाळलें नसतें तर जगाला या सरकारचा नैतिक अधःपात सप्रमाण दिसला असता अगर, दाखवतां आला असता. हें वचन कितपत पाळले गेलें हें पुढें येईलच. हे काम करून गोखले येतात तो पब्लिक सर्व्हिस कमिशनचे काम वाट पहातच होतें. हें काम अत्यंत दगदगीचं व फार जिकिरीचें होतें. रोज सहा सहा तास साक्षी ऐकून नंतर घरी त्यावर विचार करून साक्षीदारांची पुनः उलट तपासणी करावयाची! रात्री दोन दोन वाजेपर्यंत गोपाळरावांनी काम केले! १९१२-१३ च्या हिंवाळ्यांत हें कमिशन सर्वत्र हिंडलें. सर्व हिंदुस्तानभर, आणि ब्रह्मदेश वगैरे ठिकाणीही जाऊन माहिती आणि पुरावा गोळा करण्यांत आला. काम किती करावयाचे याचा प्रश्न नसे. जे करावयाचें तें उत्तम व जबाबदारपणे कसें पार पडेल इकडेच लक्ष होते. या पब्लिक सर्विस कमिशनमध्ये त्यांस किती