Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/२१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६
पब्लिक सर्व्हिस कमिशन.

सरोजिनीबाईंस विनति केली. पवित्र विचारांनी देशांतील तरुणांची मने सोज्ज्वल करण्यास त्यांनी सरोजिनीस सांगितले. राष्ट्रीय ध्येयें कवीशिवाय अन्य कोण शिकविणार? 'कविस्तु क्रान्तदर्शी' भविष्य काळांतील गोष्टी त्यास कल्पनाशक्तीने जवळ पाहतां येतात व तदनुरूप तो लोकांस मार्ग दाखवितो. ज्या वेळेस गोखले सरोजिनीस हें कर्तव्य शिकवीत होते तो देखावा किती हृदयस्पर्शी असला पाहिजे?
 मुसलमानांचा प्रश्न सुटेल अशी आशा त्यांच्या मनांत पुनः उद्भवली; वठलेल्या रोपट्यास पुनः अंकुर फुटले. त्यांची प्रकृति हळूहळू सुधारूं लागली. उत्साहाने व हुशारीने नवीन कामकाज ते पाहूं लागले.
 १९१२ मध्ये दोन महत्त्वाची कामं गोपाळरावांच्या अंगावर पडली. हीं कामे त्यांच्या अंतापर्यंत पुरली. आणि तरीही ती पुरी झाली नाहीतच. एक प्रश्न म्हणजे आफ्रिकेमध्ये हिंदु लोकांचा होणारा अमानुष आणि मनुष्यास काळिमा लावणारा छळ, आणि दुसरी गोष्ट म्हणजे पब्लिक सर्व्हिस कमिशन.
 १९१२ च्या जुलै महिन्यांत हें कमिशन बसले. या कमिशनचे अध्यक्ष लॉर्ड इस्लिंग्टन हे होते. एकंदर १२ सभासदांचं हे कमिशन होते. चौबळ, गोखले, अबदुल रहिम (मद्रास हायकोर्टाचे न्यायाधीश) असे तिघे एतद्देशीय होते. या कमिशनला विशेषतः तीन गोष्टींत चवकशी करावयाची होती.
 १ जे सनदी नोकर निवडले जातात, त्यांना शिकविण्याची पद्धत, आणि पसंतीसाठी कांहीं दिवस नौकरीवर नेमणं.
 २ नौकरीच्या अटी, पगार, रजा, पेन्शन वगैरे.
 ३ युरोपियनंतर लोकांन सनदी नौकरीत जाण्यास किती व कसकसे अडथळे आहेत; आणि या सनदी नौकरीच्या प्रांतिक आणि वरिष्ठ अशा दोन विभागण्या करण्यांत कांहीं फायदा आहे की नाहीं.
 हे प्रश्न व तत्संबंधी इतर प्रश्न, सूचना वगैरे कामे या कमिशनला करावयाची होती. या कामाला आरंभ होण्याच्या आधी गोखल्यांस आफ्रिकेत जावे लागले.