Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/१८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५५
डांस - स्वदेशी कां विलायती ?

लिहीत असत. युगांतर हे सर्वांत जास्त लोकप्रिय होतें. १९०६ मध्ये वरेंद्रकुमार घोष आणि जगत्प्रसिद्ध विवेकानंदांचे एकच एक बंधु भूपेंद्रनाथ दत्त हे या पत्राचे संपादक होते. या वृत्तपत्रांतून एकच सूर वहात होता. सर्वांच्या लेखण्या एकाच प्रकारचें वाङ्मय निर्माण करीत होत्या. 'जशास तसें,' 'टोल्यास टोला' हा उपदेश यांतून केलेला होता. रामदासी बाणा या वृत्तपत्रांनी उचलला होता. त्यांची भाषा अनुपमेय होती; त्यांचे विचार हृदयभेदक व कार्यप्रवर्तक होते; शिथिल झालेल्या अंतःकरणांत अलोट सामर्थ्याचे पूर वाहविण्याचें त्यांत सामर्थ्य होते. हें स्वदेशीचे व्रत लहानथोरांच्या मनांत इतकें बिंबलें कीं, काय सांगावें? एका लहान मुलानें आईस विचारले, 'काय ग आई, हा डांस स्वदेशी आहे कां विलायती?' 'स्वदेशी हां बाळ.' 'हो कां? तर मग मी त्यास मारणार नाहीं!' असें बाळ बोलले. ज्यांनीं आपल्या प्रतिभावान् विचारांनी वातावरण एकरूप केलें त्यांची धन्य होय. त्यांचे लेख कशा प्रकारचे होते याचा नमुना पहा.
 "सध्यांच्या काळीं रास्तपणा रसातळास जात आहे आणि अन्याय बोकाळत आहे. मूठभर परकीय लोक कोट्यवधी लोकांस त्यांचें सर्वस्व हरण करून नागवीत आहेत. त्यांची नौकरी ह्मणजे तर मोठा चरक आहे, आणि या चरकांतून असंख्य लोकांची हाडे हरहमेश भरडली जात आहेत. दास्यपंकांत खितपत पडलेलें हें राष्ट्र! या राष्ट्राची नैतिक, बौद्धिक, शारीरिक, आर्थिक, स्वावलंबनात्मक, सर्व सद्गुणांची खच्ची करून, या राष्ट्राला कायमचें पंगू करावे किंवा शक्य तर नामशेषही करावें, यासाठी हे मूठभर लोक आटोकाट प्रयत्न करीत आहेत. भारतवासीयांनो! कच कां खातां? या अन्यायाविरुद्ध चालून जाऊन तुमच्यावर कोसळणाऱ्या आपत्तींना तुझी तोंड द्या. मित्रांनों अंतःकरणांत भीतीस यत्किंचितही थारा देऊ नका. परमेश्वराच्या लाडक्या भूमीत दिवसाढवळ्या चाललेला हा अन्याय परमेश्वराला पाहवणार नाहीं. तो स्वस्थ बसणार नाहीं. भगवंताने गीतेंत दिलेल्या वचनावर पूर्ण भरंवसा ठेवा, आणि त्याला आळवा. त्याच्या शक्तीची आराधना करा ह्मणजे या अन्यायाला पदतळी तुडविण्यासाठीं तो तुमच्यामध्यें अवतीर्ण होईल.