Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/१७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४३
भारत सेवक समाजाचे ध्येय व त्याचे उद्देश.

इंडिया सोसायटीचं ध्येय, पूर्वी काँग्रेस स्थापण्याच्या आधी बंगाली तरुणांस उद्देशून ह्यूम साहेबांनी जें पत्रक काढलें होतें तदनुरूप बरेचसें होतें असें फेरोजशहांचे चरित्रकार मोदी हे म्हणतात. 'It may be mentioned— that the lines suggested by Mr. Hume were more or less adopted by Mr. G. K. Gokhale nearly three decades later in his Servants of India Society.'
 ब्रिटिश साम्राज्यान्तर्गत वसाहतींचा दर्जा प्राप्त करून घेणें हें यांतील सभासदांचे ध्येय आहे. या ध्येयाच्या सिद्धीसाठीं वर्षेच्या वर्षे अविश्रांत परिश्रम झाले पाहिजेत, आणि देशाची संघटना केली पाहिजे. जे लोक या कार्यास येऊन मिळतील त्यांच्यावर संकटें कोसळतील, मोह आवरण घालूं पाहील; परंतु संकटांस टाळून व मोहास न भाळून आपले पवित्र कर्तव्य सिद्धीस नेण्यासाठी प्रत्येक सभासदानें झटावयाचें. कुचराई करावयाची नाहीं.
 या सर्व गोष्टींची जाणीव हिंदुस्तानांतील लोकांस पटविली पाहिजे. ज्याप्रमाणे धर्मप्रसारार्थ सर्वसंगपरित्याग करून कामे करणारे लोक असतात, तद्वत् जनसेवा ही जनार्दनसेवाच आहे अशा उत्कट भावनेनें लोकांनीं आतां पुढे यावें. देशप्रेमापुढे इतर सर्व गोष्टी तुच्छ, कवडीमोल वाटल्या पाहिजेत. स्वार्थत्यागपूर्वक काम करा म्हणजे तें कार्य पवित्र आहे.
 एवंप्रकार उच्च ध्येय डोळ्यांसमोर ठेवून निधड्या छातीने व परमेश्वरावर दृढ श्रद्धा ठेवून प्रत्येक देशहितचिंतकाने कामास आरंभ करावा, आणि आपल्या कामांत रमण्यांत सात्त्विक आनंद मानून सुखी व्हावें.
 सनदशीर मार्गाने चळवळ करून देशाची सर्वांगीण उन्नति करणें, व ती उन्नति करण्यासाठी देशांतील तरुणांस तयार करणें हें संस्थेचे ध्येय आहे. एतदर्थ खालील गोष्टी सभासदाने कराव्याः-
 (१) आपल्या स्वतःच्या उदाहरणानें लोकांत खरीखुरी देशभक्ति उत्पन्न करणें आणि तदर्थ त्यांस स्वार्थत्याग करण्यास शिकविणें.
 (२) लोकांस राजकीय शिक्षण देणें आणि समाजांत चळवळ करून लोकमत तयार करणें.