Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७३
कै. रानड्यांची शिकवण.

दाखविणारा गेला. काळ्याभोर अंधारांत चंद्राप्रमाणे शीतल प्रकाश देणारा महात्मा मृत्युराहूच्या मुखांत पडला. सर्व देश हळहळला. कोण हळहळणार नाहीं? या मृत्यूने गोपाळरावांच्या मनाची स्थिति किती चमत्कारिक झाली असेल बरें? ज्याने नवीन दृष्टि दिली, नवीन सृष्टि दाखविली, संकटाच्या वेळीं सदुपदेशाची वृष्टि केली त्या पितृतुल्य गुरूच्या मृत्यूनें गोपाळराव क्षणभर स्तिमित झाले. परंतु क्षणभरच. रानड्यांनी रडावयास शिकविलें नाहीं तरी रडें गिळून काम करता करतां पडावयास शिकविलें. समर्थांच्या समाधीच्या समयीं त्यांचे शिष्य असेच मुळूमुळू रडावयास लागले, तेव्हां समर्थांनी काय सांगितले होतें? 'आजपर्यं शिकलांत तें रडण्यासाठींच कां? मी चाललो तरी माझा दासबोध आहे. त्यांत माझा आत्मा आहे. तो दासबोध समोर ठेवून वागा म्हणजे मी जवळ असण्यासारखेंच आहे. या समयी गोखल्यांसही रानड्यांचाच उपदेश आठवला असेल. जीवित म्हणजे कर्तव्य आहे. येथे रडावयास वेळ नाहीं. आपला शोकावेग त्यांनी आवरला, डोळे पुसले आणि गुरूचा उपदेश जो अंतरी सांठविलेला होता तदनुसार वागावयाचें ठरविलें.
 न्या. रानड्यांची स्मारके सर्वत्र उभारण्यांत आली, कोठे वाचनालय, कोठें ग्रंथालय; कोठें तसबीर; कोठें पुतळा; कांहींना कांहीं तरी या थोर पुरुषाचें स्मारक लोकांनीं केलें. आपल्या गुरुस आणि आपल्या गुरुभक्तीस साजेसें स्मारक गोपाळरावांनीं उभारावयाचे ठरविले. त्यांनीं वर्गणीसाठीं व्याख्यानें दिली. एक लाख रुपये गोळा केले या रकमेंतून पुण्यास सर्व्हंट ऑफ इंडिया सोसायटीच्या अग्रभागीं, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या जवळ स्मारकार्थ 'इंडस्ट्रिअल व एकॉनॉमिक इन्स्टियूट' स्थापण्यांत आली. या इमारतीचा उद्घाटन समारंभ १९१० मध्ये गव्हर्नरांच्या हस्ते झाला, येथें अर्थशास्त्रावरील निवडक पुस्तकांचा चांगला संचय आहे. प्रयोगशाळाहि साधारण चांगली आहे. परंतु एक लाख रुपयांत हीं कामें यशस्वी कशी होणार? फक्त अर्थशास्त्राचा व्यासंग व अभ्यास करणासाठीं हीं संस्था स्थापिली असती तर बरे झाले असतें. परंतु गोखल्यांच्या आशेस पारावार नव्हता. 'I know no limitations for the aspirations of my Countrymen' हें त्यांचे वाक्य. प्रयोगशाळेंत शोध