पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/5

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शिक्षक नवा झाला तर शिक्षण नवे होणार


 'नवे शिक्षण, नवे शिक्षक' हे पुस्तक मी 'जडण-घडण' मासिक, पुणेमध्ये सन २०१४ ला 'नवे शिक्षण' व सन २०१५ ला 'नवे शिक्षक' सदरात प्रामुख्याने लिहिलेल्या लेखांचा संग्रह होय. शिवाय, या पुस्तकात याच काळात लिहिलेले शिक्षणविषयक काही अन्य लेखही आहेत. ते विविध शैक्षणिक संस्थांच्या रौप्यमहोत्सवी स्मरणिकांसाठी म्हणून लिहिलेले होते. यात शिक्षक दिनाच्या अनुषंगाने लिहिलेलेही काही लेख आहेत. यापूर्वी माझे 'एकविसाव्या शतकातील समग्र शिक्षण' नावाचे एक पुस्तक प्रकाशित झाले आहे. माझे तरुण संपादक मित्र डॉ. सागर देशपांडे यांचे व अन्य मित्र, सहकारी यांच्या शिक्षण प्रेमामुळे हे लेखन प्रामुख्याने घडले. काही लेखन शिक्षणविषयक दिवाळी वार्षिकांसाठीही झाले आहे.
 मी २००५ ते २०१० या काळात महावीर महाविद्यालय, कोल्हापूरचा प्राचार्य होतो. आमच्या महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान विद्याशाखांबरोबर स्वतंत्र अशी अध्यापक शिक्षण (शिक्षणशास्त्र/शिक्षक प्रशिक्षण) विद्याशाखा होती, या शाखेमार्फत शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरची मान्यता असलेला बी.ए;बी.एड्. हा एकात्मिक अभ्यासक्रम चालत असे. स्वतः मी सन १९६७ ते १९७१ या कालखंडात श्री मौनी विद्यापीठ, गारगोटी येथून डिप्लोमा इन रुरल सर्व्हिसेस (एज्युकेशन) हा बी.ए:बी.एड्. समकक्ष एकात्मिक अभ्यासक्रम उत्तीर्ण होऊन माध्यमिक शाळेत शिक्षक झालो होतो. सन १९७१ ते १९७९ अशी आठ वर्षे मी विविध माध्यमिक शाळात हिंदी, विज्ञान, समाजशास्त्र, कार्यानुभव इत्यादी विषयांचे अध्यापन केले. नंतर सन १९७९ ते २०१० अशी ३१ वर्षे हिंदीचे अध्यापन केले.