पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/17

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

टंकन (Typing) असेल. अक्षर व अंक तो टाईप करेल. लिहिणं, गिरवणं, संपलं. बेरीज, गुणाकार, भागाकार तो संगणक, कॅल्सीवरच शिकेल. गृहपाठ वह्या नसतील. दोन लॅपटॉप असतील. एक घरचा घरी, दूसरा शाळेतला शाळेत. दोन्ही इंटरनेटने जोडलेले असतील. होमवर्क तो शाळेतून जाताना घरच्या पीसीवर फॉरवर्ड करेल. घरी होमवर्क पूर्ण करून ते शिक्षकांना सेंड करेल. शिक्षक तपासून दुरुस्त करायच्या सूचना मेल करतील. पालकांना एसएमएस/मेल/क्लिप करून शिक्षक पाल्याची प्रगती कळवत राहील.
 ही मुलं फार तर हायस्कूलपर्यंत शाळेत शिकतील. तोवर कॉलेजीस बंद झालेली असतील. सारं उच्च शिक्षण ऑनलाईन, व्हर्च्युअल होईल. विद्यापीठे, डिग्री सारं व्हर्च्युअल व ई-कंटेंट देणारं असेल. विद्यार्थी व शिक्षक हे व्यक्तिशः निवडले जातील. विद्याथ्र्यांना अभ्यासक्रम, पदव्यांचे शेकडो पर्याय उपलब्ध असतील. शिक्षणासाठी हॉर्वर्ड विद्यापीठला अमेरिकेत जायची गरज राहणार नाही, विद्यापीठच तुमच्या दारी येईल.
 घराच्या शेजारी कुठं तरी मार्गदर्शन, समुपदेशन, प्रात्यक्षिक, शंका निरसन केंद्र असेल. ते तुम्हास आवश्यक ते सारं साहाय्य पुरवील. शिक्षण म्हणजे वर्ग, फळा, शिक्षक, शाळा ही संकल्पना संपुष्टात येऊन व्यक्तिगत स्वयंशिक्षणाची पर्यायी व्यवस्था विकसित होईल. हे भारतातील नागरिकांना आज वाचताना काल्पनिक, प्रसंगी स्वप्नवत वाटलं तरी जगात प्रत्यक्षात आलेलं वास्तव आहे. ते आज आपल्या उंबरठ्यावर आहे. उद्या ते घरीदारी होईल, अशी शिक्षणातील भारताची भविष्यगती आहे. त्यासाठी कात टाकण्याशिवाय पर्याय नाही.

•••

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१६