पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/168

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पूर्व प्रवास (जिथे सहल नेणार त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी, अभ्यास, सर्वेक्षण, माहिती, व्यवस्था, वेळ इ. नियोजन करणे) प्रकल्प तयारी, शैक्षणिक साधनांची निर्मिती, चर्चा, साधन संकलन, संदर्भ शोध, व्याख्यान, लेखन, संशोधन, परीक्षा तयारी, गृहपाठ तपासणी, उत्तर पत्रिका मूल्यांकन, प्रश्नपत्रिका तयार करणे, स्वाध्याय तयार करणे असे बरंच करू शकतो. असे सुट्टीचं नियोजन करता का? एकदा करून पाहा. अनुभव हीच खात्री.
नव्या अभ्यासक्रमाची तयारी
 शिक्षक दोन प्रकारचे असतात (१) तयारी करून शिकवणारे. (२) तयारीचे. नवे शिक्षक तयारी करून शिकवितात. जुने शिक्षक तयारी नाही करीत. अभ्यासक्रम कसलाही असो, नवा, जुना तो त्याची तयारी नाही करीत. असे शिक्षक 'तयारीचे शिक्षक' पण काही जुने शिक्षक मी निवृत्तीच्या वर्षीही तयारी करून शिकविणारे पाहिले आहेत. रोज तयारी करून शिकवणारा शिक्षक उपक्रमशील. त्यामुळे त्याचे दरवर्षीचे अध्यापन नवे राहते. रोज नवे वाचन, नव संदर्भ संकलन, आपले अध्यापन ताजे करते. अभ्यासक्रम नवा असो वा जुना, तयारी रोज हवी. तुम्ही भाषेचे शिक्षक असाल तर नवप्रकाशित पुस्तके वाचा. इतिहास भूगोलचे असाल तर नवे नकाशे तयार करा. विज्ञान शिक्षक असाल तर नवे शोध वाचा, सांगा. प्रत्येक विषयात रोज नवे घडत असते. आपल्या रोजच्या अध्यापनात नव संदर्भ विचारपूर्वक योजून, चपखल वापरले पाहिजेत. शैक्षणिक साधने तयार करणाच्या शिक्षकाने नवे तंत्रज्ञान वापरले पाहिजे. नाट्यीकरण, भाषणे, स्पर्धा, नृत्य, आविष्करण, कृती, समूह सहभाग सर्वातून शिक्षण सर्जनशील, कृतीप्रधान, रंजक शिवाय ज्ञानकेंद्री होईल असे पाहिले पाहिजे. उपक्रमशीलता ही अभ्यासकेंद्री, व्यक्तिविकास केंद्री, समूह सहभागी, नवी, कल्पक, समकालीन असायला हवी.
सहल
 सहल हा विद्यार्थी, पालकांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा उपक्रम. शिक्षक त्याकडे मुख्याध्यापकांनी लादलेले काम, दिलेली शिक्षा म्हणून पाहतील तर त्यातले चैतन्यच नाही का हरवून जाणार. सहलीचे नियोजन हवं. तिचा उद्देश ठरलेला असावा. त्यानुसार पूर्व तयारी असावी. सहल न्यायच्या ठिकाणी शिक्षकांनी पूर्व भेट, नियोजन, निवास-भोजन व्यवस्था इ. चे नियोजन करायला हवे. एका भेटीत अनेक विषय, अमूल्य माहिती

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१६७