पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्रिस्तरीय होता. जागतिकीकरणाने उंचावलेल्या आर्थिक मानात मध्यमवर्ग संपुष्टात आला, निम्न मध्यमवर्गाचे निम्नवर्गात रूपांतर झाले. उच्च मध्यमवर्ग उच्च वर्ग बनला. सध्या समाजात दोनच वर्ग आहेत, दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील. सोप्या शब्दांत समाज गरीब व श्रीमंत वर्गात विभागला आहे. मोल-मजुरी, हंगामी नोकरी, करारबद्ध वेतन (अंगावर काम/खंडून काम) असा एक वर्ग. दुसरा वर्ग मिळवतो, पण शाश्वती नसलेला. उद्याची भ्रांत असलेला सध्या भारतात हाच वर्ग उत्पादक राहिला आहे. नोकरदार (सुरक्षित) व मालक वर्गाची सध्या चांदी आहे. उत्पन्न अधिक, खर्च कमी यामुळे त्याचे जीवनमान निरंतर उंचावते आहे. उलटपक्षी गरीब वर्गाच्या उत्पन्नापेक्षा महागाईमुळे खर्च वाढता राहून गरिबी वाढते आहे. घटनेत समाजवाद असला, तरी आपला सामाजिक व्यवहार भांडवल धार्जिणा झाला आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते बघ्या समाजासाठी सेलिब्रेटी बनले आहेत. ते माध्यमांचे च्युईंगम बनून रोज प्रसिद्धी, वाद-विवादात दंग आहे. खरे समाज हितैषी गोळ्या खाऊन मरत आहेत. न पेक्षा अप्रसिद्ध राहून मार्जिनल कार्य करत सातत्याने शांत क्रांती घडवत आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण सत्कार्याचे शासन, समाज, माध्यमांना देणे-घेणे राहिले नाही. सनसनाटी, झगमग, कॅमेरा व फ्लॅशगन स्वत:कडे वळवत ठेवण्याचे कौशल्य हा नवा समाज धर्म बनल्याने सामान्य माणसाला गुंगारा देणे, गुंगीत ठेवणे सोपे झाले आहे. इव्हेंटबेस प्रपोगंडा, बर्थ-डे, सेलिब्रेशन फंडा, फ्लेक्स कल्चर, होर्डिंग हँग ओव्हरमुळे जगण्याचे व विकासाचे खरे प्रश्न मार्जिनल होत जातीय, धार्मिक, सांस्कृतिक अस्मितांना आलेले टोक हे क्षणिक रंजक खरे पण अंतिम हिताचे खचितच नाही. स्पर्धा परीक्षांमागे धावणारे लक्षावधी घोडे रेसचा एक नियम विसरेल की स्पर्धेत यशवंत शंभरात दहाच असतात. नव्वदांचे वैफल्य स्पर्धेतून पूर्ण बाद (वय उलटल्यावर) झाल्यावर लक्षात येते, ते ९०% तिशी पार करत लग्न, नोकरी, व्यवसाय सर्व क्षेत्रात कुचकामी ठरतात. युएसएसचं स्वप्न घेऊन जगलेली तरुणाई श्रम संस्कृतीत पूर्णतः निकामी सिद्ध होते.
 शिक्षक घटकाबद्दल मी इतके लिहिले असल्याने येथे अनुल्लेखच उल्लेख ठरावा.
 पालक समाजाचा अविभाज्य भाग असल्याने 'समाज' चिंतनात त्यांचेच प्रतिबिंब आहे.
 विद्यार्थी 'मुकी बिचारी, कुणी हाका' अशा स्थितीत कालही होते, आजही आहेत, उद्याही ते तसेच राहणार आहेत.

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१३६