पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्थलांतर या गोष्टींमुळे एके काळी सार्वत्रिक शिक्षण देणाऱ्या मराठी माध्यमांच्या शाळांना ओहोटी लागली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा प्रलोभने दाखवत, देत (गणवेश, भोजन, वाहन, शैक्षणिक साहित्य इ.) टिकून असल्या, तरी शिक्षकांची मानसिकता पाट्या टाकण्याची असल्याने त्या फार काळ तग धरतील असे वाटत नाहीत. आजच शिक्षकांचे समायोजन (एका शाळेतून दुसऱ्या शाळेत मुखडे) गतिमान आहे, उद्या शाळांचे समायोजन काळ्या दगडावरची रेघ होय. शिक्षक संघटनाही हक्कांच्या लढाईत गर्क आहेत. शासन, संस्था, शिक्षक ज्याला त्याला आपले अंगावरचे कपडे वाचवण्यात धन्यता वाटते. बळी आहे तो गरीब, वंचित विद्यार्थी, त्याच्याशी कुणाचेच देणे-घेणे राहिले नाही. यामुळे शिक्षणात 'बळी तो कान पिळी' हाच कायदा अस्तित्वात आल्याचे चित्र आहे.
 खासगी संस्थाचालक, त्यांच्या संस्था, संचालक, शिक्षक, शाळा कधी काळी ध्येयवादी होत्या. कारण त्यांचे स्थापक टिळक, आगरकर, महात्मा गांधी होते. स्वातंत्र्योत्तर कालखंडातील संस्थांचे प्रेरक फुले, शाहू, आंबेडकर राहिले आहेत. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर कालखंडात स्थापन झालेल्या संस्था, संघटनांमागे राष्ट्रीयता, ज्ञाती कल्याण, वर्ग-वर्ण अस्मिता व आकांक्षा विकास भावना कार्यरत होती. नंतरच्या पिढीत आलेले संस्थाचालक आयत्या पिठावर रांगोळ्या ओढणारे निघाले. त्यांनी आपल्या शिक्षण संस्था आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील असे पाहिले नाही. त्या त्याग, समर्पण, ध्येयात मशगुल राहिल्या. उत्तराधिकारी पट्टीचे व्यावसायिक निघाले. ज्यांना आर्थिक दूरदृष्टी होती. राजकीय पाठबळ होते अशांनी डी.एड., बी.एड., इंजीनिअरिंग, मेडिकल, पॉलिटेक्निक सुरू करून विशाल शिक्षण संकुले उभारली. परिसरातील विद्यार्थ्यांची सोय झाली, मूली शिकत्या झाल्या, शिक्षित पिढीस शिक्षक रोजगार लाभला, सततच्या वाढत्या देणगी फी (कॅपिटेशन/डोनेशन), शिक्षक-प्राध्यापकांचे वाढते वेतनमान (पाचवा/ सहावा वेतन आयोग) यामुळे संस्थाचालक मालक बनले व शिक्षक प्राध्यापक सालदार. संस्थांची विद्यार्थी क्षमता, तुकड्या निरंतर वाढत राहण्याच्या उद्योगात मागणी-पुरवठ्याचे गणित विस्कटले. आज संस्था आहेत, पण विद्यार्थी नाहीत, शिक्षक आहेत, पण शिक्षण नाही. हे विदारक चित्र शासनकर्त्यांच्या ऱ्हस्व शिक्षण दृष्टी व स्वार्थी विकासनीती यांचे अपत्य होय.
 भारतीय समाज सन १९९० पूर्वी निम्न, मध्यम व उच्च असा

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१३५