पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५. ज्ञानरचनावाद ते कौशल्य विकास
 भारतीय शिक्षण औपचारिक होते तसेच ते केवळ माहिती पुरविणारे होते. त्यात विद्यार्थी केंद्रिततेचा अभाव होता. उलटपक्षी जगात मात्र शिक्षणाचे केंद्र विद्यार्थी होते. विशेषत: इ. स. १७५० ते १८५० हा कालखंड आपण पाहू लागलो तर रुसो, पेस्टॉलॉजी, फ्रोबेल यांच्या विचारांमुळे युरोपमध्ये मुलांच्या नैसर्गिक विकासाचे तत्त्व मान्य करून शिक्षणाची रचना करण्यात आली. पण प्रत्यक्षात मात्र शिक्षणात त्याचे प्रतिबिंब दिसून येत नव्हते. मुले स्वत:च आपल्या ज्ञानाची निर्मिती करत असतात, यावर शिक्षकांचा विश्वास नसावा असे शैक्षणिक वातावरण होते, त्याला छेद देण्याचे कार्य ब्रूनरने केले. त्यातून बालकेंद्री शिक्षणाचा विचार सुरू झाला. सध्या शिक्षण जगतात ज्ञानसंरचनावादाची (Constructivism) जी चर्चा सुरू आहे, त्यानुसार ज्ञान हे विद्यार्थ्यांकडून आणि विद्यार्थ्यांमध्येच विकसित होत असते, हे मान्य करून ते देण्याची वा हस्तांतरित करण्याची पूर्वापार पद्धत बंद करण्यात आली. ज्ञाननिर्मितीकेंद्री अध्यापनास महत्त्व हे ज्ञानसंरचनावादाचे मूळ उद्दिष्ट स्वीकारण्यात आले आहे. त्यासाठी बुद्धीला चालना देणारे वातावरण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शिक्षणसंस्थांची व शिक्षकांची असल्याचे स्पष्ट झाले असून त्यानुसार २०१३ पासून प्राथमिक स्तरावर या नव्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.
 त्याच्या पुढची पायरी म्हणजे कौशल्य विकास होय. विद्यार्थी केवळ ज्ञानसंपन्न असून भागणार नाही. प्राप्त ज्ञानाचा उपयोग जीवन जगण्यासाठी होणे ही वर्तमान शिक्षणाची पूर्व अट होऊन बसली आहे. जागतिकीकरणाच्या रेट्यात कुशल मनुष्यबळाची वाढती मागणी लक्षात घेता विद्यार्थी हा तंत्रकुशल असायला हवा. याचे भान देशास झाल्याने शिक्षणात कौशल्य विकासास असाधणार महत्त्व देण्यात आले आहे. आजच्या घडीला भारत हा जगातला सर्वांत तरुण देश आहे. भारताच्या विद्यमान लोकसंख्येच्या ५४% हे २५ वर्षांच्या आतील तरुण मुले-मुली आहेत. सन २०२२ पर्यंत ही संख्या १० कोटीच्या घरात असेल. (कार्यक्षम तरुण मनुष्यबळ) हे लक्षात घेऊन नव्या शिक्षण धोरणाचा (२०१६) जो मसुदा प्रकाशित करण्यात आला आहे, त्यात शिक्षणाचे व्यावसायीकरण व विद्यार्थ्यांचे कुशल मनुष्यबळात रूपांतर करणे हे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, "To enhance employability, a blend of education and skill is essential for individual growth and economic

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१३२