पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिक्षण सेवक नियुक्ती, तासिका तत्त्वावर प्राध्यापक नियुक्ती, भौतिक सुविधांचा अभाव, पैसे घेऊन शिक्षक, प्राध्यापकांच्या व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वाढत्या नियुक्त्या, वेतनेतर खर्च, अनुदान कपात, शाळा भाडे बंद करणे अशी मोठी यादी देता येणे शक्य आहे. प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन पातळीवर 'रुसा' (RUSA) योजनांची अंमलबजावणी झाली. उच्च शिक्षणात गुणवत्तेसाठी 'नॅक' मानांकन आले, शिक्षक गुणवत्ता वाढीसाठी 'एपीआय' आला. सार्वत्रिक शिक्षणाची गुणवत्ता वाढावी म्हणून केलेल्या प्रयत्नांची फलनिष्पत्ती म्हणून शिक्षण भौतिक संपन्न झाले. पण अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके ही कालबाह्यच राहिली. उच्च शिक्षणातील स्वायत्ततेचे प्रतिबिंब म्हणून प्रगत अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके आलीत असे म्हणणे वस्तुस्थितीचा विपर्यास ठरेल. बालभारतीची पाठ्यपुस्तके व पाठ्यक्रम, विद्यापीठीय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके यांचे काळाच्या कसोटीवर मूल्यांकन केल्यास विद्यार्थी वर्गात का बसत नाहीत, याचे उत्तर हाती येईल.
 प्रश्न सार्वत्रिक शिक्षणाच्या गुणवत्तेचा जसा आहे, तसा खासगी शिक्षण संस्थांतील शिक्षण मूल्यांचाही आहे. सार्वत्रिक शिक्षण शिक्षकांची हमी देते. 'शिक्षणाची हमी देणारे शिक्षण' हे वर्तमान सार्वत्रिक, खासगी व जागतिकीकरणाने येणाऱ्या विदेशी शिक्षण व्यवस्थेपुढचे आव्हान आहे. नव्या काळात ऑनलाईन एज्युकेशन, व्हर्च्युअल एज्युकेशनच्या नव्या व्यवस्था रूढ व लोकप्रिय होत आहेत. पारंपरिक शिक्षण पठडी बदलून कालसंगत शिक्षण हिच जागतिकीकरणाची खरी गाज आहे.
३. मौखिकतेकडून दृक-श्राव्य शिक्षणाकडे
 आपण एकविसाव्या शतकात प्रवेश केला आहे. हे शतक 'माहिती व तंत्रज्ञानाचे युग' म्हणून महत्त्वाचे आहे. प्रगत देशांतील शिक्षणाचा प्रवास मौखिक अध्यापनाकडून (oral) दृक-श्राव्य अध्यापनाकडे (Audio-Visual Teaching) असा होताना दिसतो. प्रगत देशात जागतिकीकरणामुळे आपले शिक्षण जगात श्रेष्ठ ठरावे म्हणून जागरूकता आढळते. 'पिसा' चे निर्देशांक प्रमाण मानून वाचन, विज्ञान व गणित प्रमाण अभ्यासक्रम भाषा, विज्ञान व गणिताद्वारे अक्षर व अंकांच्या समन्वयाने भौतिकाचा वेध घेण्याची अटकळ त्यामागे दिसून येते. जगाला याचे भान आहे की नवी विद्यार्थी पिढी ही जन्मतः संगणक साक्षर आहे, त्यांचे वर्णन Digital Native वा Digital Kid असं केले जाते. नवी आई मुलाला जन्म दिला न म्हणता 'बाळ डाऊनलोड केले' म्हणते. ही बाळे खुळखुळ्याशी न खेळता 'गुगल'

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१२८