पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/२११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 प्रेमचंदाची 'बोध' नावाची एक कथा आहे. ती कथा पोलीस, तलाठी, डॉक्टरपेक्षा शिक्षकाचा व्यवसाय का व कसा श्रेष्ठ ते समजावते. ती कथा शिक्षक-विद्यार्थी संबंधांवरचे सुंदर, मार्मिक भाष्य आहे. त्या आधारे आपला आत्मस्वर हीच आपली कसोटी मानायला हवी. भारतात शिक्षक व्यवसायात आल्यानंतर अपवादानेच आपली गुणवत्ता, औपचारिक पात्रता वाढवतात. व्यवसायात प्रवेश झाला की त्यांना मोक्ष मिळतो. व्यापारी आपले भांडवल रोज वाढेल असे पाहतो. शिक्षकाने आपले ज्ञान रोज वाढेल याबद्दल दक्ष असायला हवे. आज देशापुढची संकटे चक्रव्यूह भेदण्याची आहेत. शिक्षित श्रीमंत होतात. कष्टकरी गरीब राहतो. प्रत्येक माणसाचं उत्पन्न वाढते आहे. पण माणसाची किंमत कमी होते आहे. माणसाची किंमत कमी होण्यासारखा दुसरा सांस्कृतिक ऱ्हास नाही. 'क्वालिफाईड' आणि 'क्वालिटेटीव्ह' शब्दातील अंतर शिक्षक समजून घेतील तर त्यांना आत्मस्वर गवसेल. ज्यांना आत्मस्वर गवसतो त्यांच्यात स्वऊर्जा आपोआप निर्माण होते. अशा शिबिराचे काम इंजेक्शन अथवा व्हिटॅमिनसारखे प्रासंगिक प्रेरणा देण्यासारखे आहे. शिक्षक देश, समाजाचा संवेदना सूचकांक व्हायला हवा, तसाच तो होकायंत्रही असायला हवा. दशा सुधारणे, दिशा दाखवणे हे द्रष्ट्या शिक्षकांचे कार्य असते. ते तुम्ही करावे, असे आव्हान करून मी माझे भाषण संपवतो. जयहिंद !

•••

नवे शिक्षण, नवे शिक्षक/२१०