पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पक्ष्यांच्या चोचींच्या आकारातील फरक का घडले असतील' यासारख्या प्रश्नांतून झाली.पुढे अनुवंशशास्त्राची भर पडल्यानंतर उत्क्रांतिवादाला नेमका आकार आला.निसर्गाचे अनेक खेळ त्यातून समजले.हळूहळू प्राणीस्वभाव आणि प्राण्यांचे संघटित समाज यांच्या घडणीवर उत्क्रांतिवादाच्या मार्गाने बराच प्रकाश पडला.सोशियो-बायॉलॉजी किंवा प्राणी-समाज शास्त्र नामक उपशाखा निर्माण झाली.अखेरीस मनुष्यसमाजाच्या रचनेचे गुह्य शोधण्याच्या टप्प्यापर्यंत उत्क्रांतिवाद येऊन पोचला.

 या प्रकरणात बघितलेल्या विविध उदाहरणांमधून असे दिसते की,नैसर्गिक साधन-संपत्तीच्या वापराचा धागा पकडून मानवी समाजरचनेच्या काही अंगांबद्दल एक तार्किक समज निर्माण होऊ शकते.यांचा अर्थ असा मुळीच नव्हे की,संस्कृतीचे प्रत्येक अंग उत्क्रांतिवादाच्या चष्म्यातून पाहिल्यास समजते.कॅन्सर होण्याची शक्यता माहीत असूनही माणसे तंबाखू ओढतात.दारूने होणारी धुळधाण डोळ्यासमोर असतानाही समाजात दारूपान प्रतिष्ठेचे होते.सर्व प्राण्यांबद्दल दयाबुद्धी बाळगण्यास सांगणारे धार्मिक तत्त्वज्ञान मान्य करणारे समूह,आयुष्यभर इतर धार्मिक गटांचा दुस्वास करतात आणि मधूनमधून अत्याचार आणि हत्याही करतात ! ती पुन्हा धर्माच्याच नावाने ! इष्ट फलासाठी देवीला नवस करणारे महाभाग गृहस्वामिनीला पायांतली वहाण मानताना संकोचत नाहीत.बुद्धीच्या जोरावर प्राणिमात्रांमधील उत्क्रांतीच्या मर्यादा ओलांडू शकणारा मानव दैनंदिन व्यवहारात स्वतःचे छोटे छोटे स्वार्थसुद्धा समष्टीच्या हितासाठी त्यागू शकत नाही.पिढ्यान् पिढ्यांच्या विचारवंतांना बोचणारी ही 'सात शल्ये' उत्क्रांतीची कास धरून उलगडतील का ? कोण जाणे ! जागतिक पातळीवर स्वजातीयांचे संपूर्ण निर्दालन करण्यासाठी पुरेशी अणुशक्ती आज मानवाच्या हाती आहे.बाबा आमट्यांच्या शब्दांत विचारायचे झाले तर मानवजात ही शक्ती आणि हे हात उगारण्यासाठी वापरणार की उभारण्यासाठी आजतरी हा यक्षप्रश्नच आहे.आपल्या जीवनाचे साफल्य,आपला सतूचित् आनंद कशामधे आहे मानवालाच ठरवायचे आहे.उत्क्रांतीच्या आजवरच्या प्रवाहामधे ही जबाबदारी कोणत्याही प्राण्यावर पडली नव्हती.ती पेलवण्याच्या प्रयत्नातून कदाचित नराचा नारायण होईल.

नराचा नारायण / १६१