पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अंड्यातून बाहेर येणान्या कोंबडीच्या पिल्लाला प्रथम माणसाचा सहवास घडला तर नंतर ते आधारासाठी माणसामागे धावते.बदकाच्या पिल्लाला माणसाच्या आवाजात बोलणारे भुसा भरलेले बदक सतत समोर आले तर ते पिल्लू माणसाच्या आवाजाने आकर्षित होते.अनुवांशिकतेतून येते ती समोरच्या प्राण्याची 'आई' म्हणून ओळख करून घेण्याची शक्ती.या सुरुवातीच्या संस्कारांना शास्त्रज्ञ इंप्रिंटिंग असे म्हणतात.पण पुढेही बाळपणात प्राणी शिकतच असतात. वाघीण आपल्या पिल्लांना शिकार करायला शिकवते.तर पक्षीण पिल्लाला उडायला लावते.त्याच्या भीतीची पर्वा न करता.माणसाचे पिल्लूही असेच शिकते.आणि इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा त्याचा 'बाळपणीचा काळ सुखाचा' जास्त मोठा असतो.या काळात त्याच्या मेंदूची बाढ होत असते आणि शिक्षणही होत असते.
 पण मोठ्यांच्या अनुकरणातून किंवा अनुभवातून मिळणाऱ्या शिक्षणावर फार मर्यादा पडतात. या मर्यादेतून बाहेर पडून माणसाने पहिली भरारी मारली ती भाषेच्या जोरावर.मानवी भाषेला प्राणिजगतात जोड नाही.भाषेमुळे अनुभव आणि ज्ञानाचे संक्रमण,हस्तांतरण फार सुलभ झाले.गाण्यातून,गोष्टींमधून माणसांनी पिढ्यान्-पिढ्यांचे इतिहास पुढे सांगितले.गुंतागुंतीच्या सांस्कृतिक रूढी समजावल्या,साता-समुद्रापलीकडची जगे परिचित करून घेतली. माणसाला भाषा कधी सापडली ? याचे उत्तर अजून कोणाला माहीत नाही.इतर प्राण्यांना भाषा नाही का ? प्राणी एकमेकांना इशारे देतात,संदेश देतात.त्याकरता हावभाव,हातवारे ( दृष्टीद्वारे संदेश ),आवाज ( कानाद्वारे संदेश )रसायने,( नाकाद्वारे संदेश ) यांचा उपयोग करतात.

 अन्न शोधणाऱ्या मधमाशीला मधाचा,परागकणांचा साठा सापडला की ती प्रथम आपल्या पोळ्यात परतते.आपल्या सहकाऱ्यांना त्या साठ्याची दिशा,पोळ्यापासूनचे अंतर,साठ्याचे आकारमान ही माहिती समजावून सांगते.ही भाषा हातवाज्यांची आहे.पण ही कृती पूर्णपणे उपजत आहे.तिचा विकास अनुवांशिक गुणबदलातूनच होऊ शकतो.पक्षीजगतात काही नर-मादी मंजूळ स्वरांनी एकमेकाची आळवणी करतात.पोपट,मैना वगैरे पक्षी काही मानवी शब्दसुद्धा आत्मसात करतात.चिंपाझी जातीच्या माकडाला खुणांनी चार शब्द शिकवण्यात शास्त्रज्ञ यशस्वी झाले आहेत.

१४४ / नराचा नारायण