पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अवशेषांमधे सातत्य नसून अचानक प्रचंड फेरफार झालेले दिसतात.याला पारंपरिक उत्तर असे की,अवशेषांचा निसर्गक्रमात खूपच नाश होतो आणि अघलेमधले पुरावे सापडत नाहीत.यांना 'मिसिंग लिंक' असे म्हणण्याचा प्रघात आहे.उपलब्ध पुराव्यातून या दोन सिद्धांतांपैकी एक पूर्णपणे त्याज्य ठरवणे अजून शक्य झालेले नाही.पण चढउतारवादी ( पंक्चुएशनिस्ट) मतप्रवाहाला एक नवा आधार अलीकडे सापडला आहे.
 १९८० साली लुई अल्वारेझ या अमेरिकन शास्त्रज्ञाला आढळून आले की,६३ कोटी वर्षांपूर्वीच्या काही खडकांमधे इरिडियम नावाचा धातू बराच आढळतो.तो अन्यत्र फार दुर्मिळ आहे. हा कोठून आला ? एक तर्क असा की,पृथ्वीच्या रचनेत इरिडियम दुर्मिळ असला तरी अनेक उल्कांमधे तो हजारोपट प्रमाणात दिसतो.कदाचित अशा उल्कांचा फार मोठा वर्षाव पृथ्वीवर साडेसहा कोटी वर्षांपूर्वी झाला असावा.याच काळात डायनोसॉर हे प्राणी अस्तंगत झाले.तत्पूर्वी सुमारे १३ कोटी वर्षे त्यांचे जमिनीवर राज्य होते.या उल्कापातामुळे वातावरणात बदल घडून त्यातून डायनोसॉरचा वंशच्छेद झाला असावा.त्यामुळे नवीन उदयाला येत असलेल्या सस्तन प्राण्यांना अक्षरशः मोकळे रान मिळाले असावे.
 डेव्हिड राउप आणि जॉन सेपकोवस्की या दोन अमेरिकन शास्त्रज्ञांच्या मते उत्क्रांतीच्या चढउताराचे चक्र २ कोटी ६० लाख वर्षांचे आहे.या चक्रालाही खगोलशास्त्रीय कारण असावे.काही खगोलशास्त्रज्ञ मानतात की,सूर्याचा एक जुळा तारा आहे.तो दर २ कोटी ६० लाख वर्षांनी त्यातल्या त्यात सूर्याच्या जवळ येतो.यावेळी ग्रहमंडळामधे प्रचंड खळबळ माजते.अनेक धूमकेतूंचा मार्ग बदलतो.अनेक पृथ्वीवर येऊन आदळतात.यामुळे इथली जीवसृष्टी पूर्ण ढवळून निघते.

 या सर्व कल्पना वैज्ञानिक तपासणीच्या भट्टीत अजून तावून सुलाखून निघायच्या आहेत.त्यानंतर कदाचित आजचे सर्वमान्य सिद्धांत बदलावे लागतील.दुरुस्त करून घ्यावे लागतील.विज्ञानाची हीच रीत आहे.पण अशा प्रत्येक शोधाच्या संदर्भात अपरिपक्क पत्रकाराला सनसनाटी मथळ्याची बातमी देण्याचा मोह होतो.'डार्विनचा उत्क्रांतिबाद चूक होता काय ? " हा मथळा कोणाचेही लक्ष वेधून घेतेच.पण आज- पर्यंत डार्विनची मूलभूत कल्पना उधळून लावणारा कोणताही ठोस पुरावा पुढे आलेला

धूमकेतूंचे आव्हान / १२९