पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आपली लायसको विरोधी मते ठामपणे मांडली.पण परिषदेच्या अहवालातून या मतांना डच्चू मिळाला.जे. बी. एस्. हाल्डेन हा एक आघाडीचा ब्रिटिश शास्त्रज्ञ.कम्युनिस्ट पक्षाचा क्रियाशील सदस्य पक्षाखातर त्याने बायकोलासुद्धा घटस्फोट दिला.या हाल्डेनचे इशारेसुद्धा अरण्यरुदन ठरले.रशियातले विश्वकोश, पाठ्यपुस्तके, संशोधन- संस्था सर्वांतून मेंडेलच्या जेनेटिक्सची पूर्ण हकालपट्टी झाली.व्हाव्हिलोव्हचा काटा काढल्यानंतर लायसेंको त्याच्या जागी आला.लेनिन अकॅडमी ऑफ अॅग्रिकल्चरल सायन्सेसचा अध्यक्ष झाला.
 आता तर थुंकी झेलणारांची भाऊगर्दी उसळली.लायसेंकोची तत्त्वे वापरून पैशाला पासरी शोध लागू लागले. गाईंना दूध जास्त यायला लागले.दुधात लोणी जास्त यायला लागले.शेतातून भरघोस पिके डोलू लागली.यातल्या कशाबद्दलही संशय घेऊन हे संशोधन तपासणार कोण ? आणि तपासले तरी चूक म्हणणार कोण ? त्या दुधातल्या लोण्याच्या प्रमाणाचे तर सगळे हिशोब पुढे बनावट ठरले.पण त्यावेळी कोणी या लुंग्यासुंग्याविरुद्ध ब्र काढत नव्हते. कारण लगेच कोणीतरी कांगावा करावा की, हा तक्रारखोर माणूस लायसेंकोवादाविरुद्ध आहे.हा मेंडेलवादी दिसतो. भांडवल- बादी दिसतो.प्रतिक्रांतिकारक वाटतो.याचा नायनाट करा.म्हणजे संपलीच की कहाणी ! असल्या वातावरणातून विज्ञान नाही वाढत, बाजारबुणगे वाढतात.विज्ञानाला हवा खुलेपणा, चर्चा, वाद, तपासणी- चुका करण्याची मोकळीक.नवीन कल्पना मांडायला निर्भय वातावरण.एकाच पातीकडे सर्व सत्य आहे आणि तिच्याबद्दल खात्री नसणारे सर्व नराधम आहेत असे ठरले की कोंडी होते.
 सोवियत रशियात या क्षेत्रापुरती तरी ही कोंडी फुटायला पंचवीस वर्षे लागली.स्टालिनच्या पश्चात लायसेंको गटाची सद्दी ओसरू लागली.शेवटी क्रुश्चेव्ह पदच्युत झाला तेव्हा लायसेंकोचीही हलकेच उचलबांगडी झाली. पण व्हाव्हिलोव्हचा जसा काटा काढला गेला तशी वागणूक लायसेंकोच्या नशिबाला आली नाही.नोव्हेंबर १९७६ मधे लायसेंकोचा मृत्यू झाला, तेव्हा तो मॉस्कोजवळ एका छोट्याशा शेती संशोधन केंद्राचा प्रमुख होता.

 लायसेंकोच्या कारकीर्दीत रशियन शेतीच्या प्रगतीला खीळ बसली.याला इतरही कारणे असतील.पण शेतीच्या आधुनिक तंत्रांबद्दल, विशेषतः नव्या संकरित जाती

१०८ / नराचा नारायण