पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कामारेरच्या दुर्दैवी जीवनावर रशियात एक चित्रपट काढण्यात आला. त्यात शोषक समाजातले दोन दुष्ट, एक धर्मगुरू आणि एक जमीनदार, कट करून एका तरुण शास्त्रज्ञाच्या प्रयोगशाळेत शिरून त्याच्या प्राणीनमुन्यात मुद्दाम शाई भरून ठेवतात.पण चित्रपट शोकांत केलेला नाही.जगाने लाथाडलेल्या, दारोदार भटकणाऱ्या या शास्त्रज्ञाला कम्युनिस्ट कार्यकर्ते घेऊन जातात.स्वतंत्र भूमीकडे... पाश्चात्य शास्त्रज्ञही कामारेरने बनवाबनवी केली असावी असे मानत नाहीत.कदाचित एखाद्या अति- उत्साही, अतिखामिभक्त सेवकाने हा उपद्व्याप केला असावा अशी बऱ्याचजणांना शंका आहे.कामारेरची कहाणी आर्थर कोस्लर या लेखकाच्या 'केस ऑफ द मिड- वाइफ टोड' यो पुस्तकात सांगितली आहे.
 प्राण्यांचे गुणधर्म बदलता येतात आणि हे बदल पुढच्या पिढीत आपोआप जातात या सिद्धांताबदल रशियन शासकांना स्वाभाविक आकर्षण असावे.नवा समाज, नवा माणूस घडवायला कंबर कसलेली ही माणसे. एकदा समाजवादी व्यक्तिमत्त्व तयार झाले की, पुढची पिढी तशीच बनून ती व्यवस्था चिरस्थायी होईल अशी त्यांना आशा वाटली असावी.उलट जेनेटिक्स म्हणजे मेंडेल या धर्मगुरूने विषमता टिकवण्यासाठी पसरवलेले खूळ आहे, असाही समज असावा, जेनेटिक्स हे शास्त्र उत्क्रांतिवादाच्या विरुद्ध आहे.निदान नॅचरल सिलेक्शनमुळे उत्क्रांती घडते या कल्पनेविरुद्ध तरी आहेच, असे त्यांना वाटत असावे.पाश्चात्य शास्त्रज्ञांमधेही सुरु- वातीला हा समज होता. बीजपेशी म्हणजे अंडी आणि शुक्रजंतू बनताना होणाऱ्या गुणबदलांमुळे उत्क्रांती होते असे बऱ्याचजणांना वाटे.गुणबदल हे अपघाताने, योगायोगाने होतात.बदलल्या परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या 'उद्देशाने' होत नाहीत हे आता सर्वमान्य झाले आहे. गुणबदलांमुळे एकाच जातीच्या प्राण्यांमधे विविधता येते.त्यातील अनुरूप जीवांचा जास्त प्रसार होतो तो परिस्थितीमुळे.म्हणजेच मेंडेलचा सिद्धांत आणि डार्विनचा सिद्धांत परस्परपूरक आहेत.

 पण लायसैकोला हे मुळीच मान्य नव्हते.तो म्हणे की, आम्ही आमच्या गव्हाच्या जाती शिकवून तयार करू. महाव्हिलोव्ह जनतेचा पैसा उडवून उगाच जगभर हिंडतो.त्या परदेशी जाती गोळा करण्याचा काहीही उपयोग नाही. मेंडेलचे जेनेटिक्स शिकवणे हा मार्क्सवादाचा द्रोह आहे.आमच्या शोधांचा प्रसार करण्यात व्हाव्हिलोव्ह

१०६ / नराचा नारायण