पान:देशी हुन्नर.pdf/86

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ८० ]

खोदून काढून तिच्यांत सोन्याच्या किंवा रुप्याच्या तारा बसवून त्या ठोंकून त्यांचा एक जीव केलेला असतो असलें काम हा हुन्नर प्रथमतः डमास्कस शहरीं उदयास आला व तेथेंच प्राचीन काळच्या सोनाराच्या हांतून सुधारणेंच्या शिखरांस जाऊन पोहोचला. ही सुधारणा अलीकडील नाहीं. कौशल्य संबंधाची होती. हिंदुस्थानांत हा हुन्नर इराण व काबूल या देशांतून आला. पंजाबांतील सियालकोट आणि गुजराथ या दोन गांवाची हल्लीं या कामाबद्दल प्रसिद्धी आहे तरी लाहोर, जयपूर, करवली, आलवार व दात्या इत्यादि ठिकाणींही तें होत असतें. मुलतानास महंमद मुराद नांवाच्या कारागिरानें सुमारें दोनशें वर्षापूर्वी कुफ्तगारी काम करण्याची सुरुवात केली. ह्या धंद्याची मूळ उत्पत्ति प्राचीन काळच्या महान महान योध्यांची चिलखतें व हत्यारें करण्याच्या संबंधानें झाली. ते योद्धे गेले व प्राचीन हत्यारांचा उपयोग करण्याचें कारण राहिलें नाहीं. त्यामुळें धंदाही बसत चालला. मध्यंतरी कारागीर लोकांस यूरोपियन लोकांच्या उपयोगी पडण्या सारख्या जिनसां तयार करण्याची बुद्धि झाली त्यामुळें धंद्याचें पुनरुज्जीवन झालें.

 कुफ्तगारी कामाचें महेरबान व्याडन पावेल साहेबानें केलेलें वर्णन खालीं दिलें आहे.
 "वर सांगण्यांत आलेच आहे कीं पूर्वी कुफ्तगारी काम फक्त हत्यारांवर होत असे, परंतु अलीकडे हाणामारीचे दिवस गेले व हत्यारांची जरूर राहिली नाही. त्यामुळें कारागीर लोक पंजाबांत सियालकोट व गुजराथ ह्या दोन गांवी जाऊन राहिले आहेत. व तेथें पेट्या, फुलदानें, फण्या व हातांतील बांगड्या इत्यादि पदार्थीवर नक्षीचें काम करून आपला उदर निर्वाह करितात.
 कुफ्तगारी काम ज्या लोखंडाच्या भांड्यावर करणें असेल त्यांजवर पहिल्यानें तिख्याच्या सळईनें नक्षी खोदून काढितात, या नक्षींत सोन्याची किंवा रुप्याची तार बसवितात. तारेचे सोनें अगदीं शुद्ध व नरम असतें व ती पुण्यातील तारकसी लोक वापरतात तसल्या जंत्रांतून काढलेली असते. नक्षीच्या खोचींतून बसविलेली तार हातोड्यानीं ठोकितात व नंतर भांडे विस्तवावर तापवून त्याजवरील नक्षी पुन्हा एकदा ठोकतात. त्यानंतर एका जातीच्या पांढऱ्या भुसभुशीत दगडानें घांसून भांडें चक्क करितात. कधीं कधीं नक्षींत पत्ते काढलेले असतात तेव्हां त्यांच्या रुंदीच्या मानानें हातोड्यानें कम जास्त ठोकावें लागतात."