पान:देशी हुन्नर.pdf/37

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ३१ ]

त्यास दुर्गा ह्मणून एक मोठी विद्रूप देवी आहे. तिच्या गळ्यांतील माणसांची मुंडकीं, तिचे अक्राळविक्राळ स्तन पोटावर पडलेले, तिची तोंडाबाहेर आलेली, लांबलचक जीभ, व ती सुरापानामुळें बेफाम होऊन आपल्या प्रत्यक्ष पतीच्या उरावर पाय देऊन नाचत आहे, असल्या कंटाळवाण्या 'चामुंडे 'चें चित्र करून तिच्या पुढे नुसते अंडपंचे नेसलेले उघडेबोडके डोक्यावर केस वाढविलेले बंगाली लोक हातांत मोडके तोडके सुरे घऊन एखाद्या रोडक्या हल्याचे तुकडे तुकडे करीत आहेत, त्यामुळें सर्व जमीन रक्तानें लाल होऊन तिजकडे पाहणारांस किळस उत्पन्न झाल्यावांचून राहूंच नये. असला देखावा कलकत्त्याच्या, लंडनच्या व हल्लीं चालू असलेल्या ग्लास्गोच्या प्रदर्शनांत आमचेच बंगाली कामदार मोठ्या उत्सुकतेने पाठवीत असतात हें त्यांचें त्यांसच शोभो. याच चित्रांपासून थोड्या अंतरावर आमच्या पुण्यातील मारुती गुरवानें केलेल्या "पंक्ती-भोजना "चा देखावा कलकत्त्यास प्रदर्शनांत मांडिलेला होता. त्यांत गळ्यांत गोफ व कंठ्या घालून, जरीकांठी पितांबर नेसून, अंगावर काश्मीरी शाल घेऊन व फुल्यांच्या रंगीत पाटांवर आसनमांडी घालून बसलेले लोक व त्यांच्या पुढें सव्वा हात केळीच्या पानांवर आमच्या महाराष्ट्र प्रांतांतील सर्व पक्वान्नें वाढलेलीं व पानासमोर काढलेल्या सुंदर रांगोळ्या, पलीकडे कोणी भरजरी शालू, कोणी पैठणी, कोणी शेलारी नेसून हिऱ्या माणकांच्या दागिन्यांनीं लवलेल्या सुंदर स्त्रिया अप्सरेप्रमाणे चमकत आपल्या हातांतील रुप्याच्या ताटांतून एखादें सुबक पक्वान्न आग्रहानें वाढीत आहेत, व जेवणारे कोठें गौरवानें 'नको नको' ह्मणत दोन्ही हात पुढें करीत आहेत, कोठें एकच बोट दाखवून आतां आपल्या करितां तेवढेच जेमतेम घेतों असें दाखवीत आहेत, परंतु आपले डोळे त्या सुंदर चेहेऱ्याकडे लाऊन टकमक पाहत आहेत. असला देखावा पाहिला ह्मणजे बंगल्याकडील 'चामुंडा' देवीकडे बोट दाखवून मडम लोक आसपास असलेल्या हिंदुलोकांस विचारीत की ह्या दोनीही गोष्टी एकाच काळी एकाच देशांत कशा बरें संभवत असतील ? याचा जबाब देतांना आमचे देशबांधवांना बंगाली लोकांची थोडीशी निंदा करणे भाग पडे. व बंगाल्यांतील कांहीं लोक अगदींच रानटी आहेत असें म्हणावें लागे.

 कृष्णागर येथील कुंभार लोक पुण्यांतील जिनगरांप्रमाणे पूर्वी देवादिकांचीं चित्रें काढून विकीत असत परंतु डाक्तर आर्चर नांवाच्या साहेबानीं या देशाती-