पान:देशी हुन्नर.pdf/38

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ३२ ]

ल लोकांचीं चित्रें करून विकण्याचें त्यांस सुचविलें तेव्हांपासून या लोकांच्या भरभराटीस सुरवात झाली. आमच्या पुण्यामध्यें सुमारें चाळीस वर्षांपूर्वी बापूजी सुपेकर जिनगर, व काळुराम गवंडी या दोघां कारागिरांनीं हीं नवीन तऱ्हेचीं चित्रें करण्याची सुरवात केली. त्या दोघांच्या मागें तात्या व्यवहारी, सिताराम जोशी, व दाजी नारायण हे प्रसिद्धीस आले. हल्लीं सखाराम शेट सोनार व मारुती गुरव हेच नांवालौकीकास चढले आहेत. ज्याप्रमाणें बंगाल्यांत खांमटी, मिश्मी, डफळ, नाग, मीकरि, गारो, कारीन, संताळ, कोळ, भूया, बनवला, लागूली इत्यादि अनेक जातीच्या लोकांचे हुबेहुब पुतळे करून जिकडे तिकडे प्रदर्शनांत पाठवीत असतात. त्याप्रमाणें नीच वर्णाच्या लोकांचे नागवे उघडे पुतळे न पाठवितां आह्मी मुंबईहून कैलासवासी कृष्णशास्त्री चिपळूणकर यांच्या जाग्यावर हल्लीं काम करीत असलेले रावसाहेब गोपाळ मोरेश्वर साठे, तसेंच त्यांचे स्नेही मिस्तर नेने व त्यांची नुक्तीच गतझालेली रूपसंपन्न पत्नी, आणि त्यांचा तात्या नांवाचा सुंदर मुलगा यांचे हुबेहूब पुतळेच करून त्याजवर दागिने घालून पाठविले होते.

 बरद्वान प्रांतांत बोरिया, तसेच दरभंगा, हत्वा, चपरा इत्यादि गांवीही असलीं चित्रें होतात; परंतु तीं इतकीं सुरेख नसतात. लखनौ शहरीं तयार होणारीं मातीचीं चित्रें मात्र फार सुरेख असतात. त्यांच्या अंगावरील कपडेसुद्धां मातीचेच असतात. लखनौस गोकाकच्या लांकडी नमुन्याप्रमाणें मातीचे फळफळावळीसारखे नमुने करून विकतात. फळादिकांचे मातीचे नमुने दिल्ली अंबाला व भावनगर येथें होतात. परंतु गोकाकची बरोबरी कोठेंच होत नाहीं. हिरासिंग या नांवाच्या एका मनुष्यानें व लाहोर येथील शिनारे पिन्टो यानें जातीजातीच्या विषारी सर्पाचे नमुने करून व ते रंगवून विकण्याचे कारखाने काढले आहेत. त्यांस सरकारी आश्रय मिळाल्यामुळें प्रत्येक कलेक्टरानें ते खरेदी करून सर्प मारण्याबद्दल इनाम देतेवेळीं विषारी सर्प कोणता व बिन विषारी कोणता हें समजण्याकरितां ते आपल्या आफिसांत ठेविले आहेत.

 जयपूर येथील हुन्नर शाळेंत मातीचीं व कागदाचीं चित्रें करण्याचा खाना घातला आहे. ह्मैसूर संस्थानांत चंनापुलन गांवीं फळफळावळीचे नमुने करीत असतात. राजपुतान्यांतही असलीं चित्रें होत असतात. जातीजातीच्या लोकांची पुण्यास होतात त्या प्रकारचीं चित्रें ग्वाल्हेरीहन आलीकडे येऊं लागलीं आहेत. हलक्या प्रतीचीं ह्मणजे पोळाचे बैल व दिवाळींंत मांडण्याकरितां हत्ती, घोडे, वाद्य इत्यादि चित्रें गांवोगांव कुंभार लोक करितात.