पान:देशी हुन्नर.pdf/147

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १४९ ]
प्रकरण १४ वें.
कपडे.
सुतीकापड.

 या पुरातन व अफाट हिंदुस्थान देशांत कापड किती लागत आहे व तें विलायतेहून मातीच्या मोलानें आगबोटीच्या आगबोटी भरून येत आहे, तरी अजूनही आमच्या देशांत मुळींच कापड होत नाहीं असा जिल्हा सांपडणे कठीण.यंत्रविद्येच्या जबरदस्त साहाय्यानें पाश्चिमात्यांनीं किती जरी सुरेख कापड काढलें तरी सुद्धां त्याच्यावर कडी करून त्याहीपेक्षां सुरेख माल काढणारे आमच्या देशांत कारागीर पुष्कळ आहेत ही गोष्ट मोठी भूषणार्ह आहे. भूस्तर विद्येच्या साहाय्यानें ज्याप्रमाणें कोणचा प्रदेश कोणच्या खनिज तत्वांनीं भरलेला आहे असें कळतें त्याप्रमाणें आमच्या देशांतील लोकांच्या पोषाखावरून त्यांच्या प्राचीन इतिहासाचा बराच उल्लेख होतो. हिंदुस्थानाच्या उत्तरेस शेवरीच्या सालींच्या व हिंदुस्थानाच्या दक्षिणेस चांदळ किंवा चांदकुडा या नांवाने प्रसिद्ध असलेल्या झाडाच्या सालींच्या विजारी करितात. यावरून आमच्या पूर्वजांनी अनंत काळापूर्वी कपडे प्रथमच कसे शोधून काढले असावे याचें अनुमान करितां येतें. तसेंच अजूनही मंत्रतंत्र लिहिण्याकरितां भूर्जपत्रांचा उपयोग करितात, त्यावरून व ताडपत्रावर लिहिलेले ग्रंथ आमच्या जवळ शिल्लक आहेत त्यावरून लिहिण्याची कला प्रथम निघाली तेव्हां आमच्या पूर्वजांनी कागदाच्या बदला कोणत्या पदार्थाचा उपयोग केला असावा याचें ही धोरण बांधितां येतें. अजून ओढिया प्रांतीं जोवंग लोक झाडाचीं पानें एका ठिकाणीं शिवून त्याचे कपडे करितात, व वायव्येकडील सरहद्दीवरील लोक बकऱ्याच्या कातड्याचे कपडे वापरून थंडीचें निवारण करितात. एकीकडे जाडे भरडे सुताडे विणून त्याचे कपडे करून आपल्या शरीराचें रक्षण करणारे लोक या देशांत आहेत, व दुसरीकडे अब्रवान ह्मणजे वाहतें पाणी व “शबनम " ह्मणजे संध्याकाळचे दंव या नांवांनीं प्रसिद्ध असलेलीं डाका येथील मलमलीचीं पातळें नेसून कपडे असून नाहींत असें भासविणाऱ्या चैनी नायिकाही आढळतात. यामुळें शरीराचें रक्षण करण्याचें साधन या देशांत कसें शोधून काढिलें