पान:देशी हुन्नर.pdf/146

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १४८ ]

त्याजवर अभ्रक बसवून नक्षी केलेली होती. रत्नागिरी येथूनही मे. क्यांडी साहेबानें एक लहानसें सुरेख इरलें पाठविलें होतें.

 लग्नांत, वराच्या डोक्यावर धरण्याकरितां रेशमी कापडाच्या छत्र्या कोठें कोठें तयार करतात तसेंच सोनेरी कळसाचें रंगा रंगाच्या छालरीचे व सुरेख नक्षीदार दांडीचें अबदागीरही ठिकठिकाणीं तयार होतात. परंतु त्या दोन्ही जिनसा व्यापाराच्या संबंधानें महत्वाच्या आहेत असें ह्मणवत नाहीं.

कुंचे, मोरचल वगैरे.

 मोरांच्या पिसांचें कुंचे जैन लोक वापरितात. आपल्या लोकांच्या देवळांतूनही कोठें कोठें मोरांच्या पिसांचे कुंचे आढळतात. गवताचें कुंचे देव्हारे झाडण्या करितां तयार करितात इंग्रेजी कुंचे ह्मणजे ब्रश, केंसांचें, तारेचें किंवा इतर पदार्थांचें होतात. तसले ब्रश काथ्याचें किंवा भेरली माडाच्या पानास असलेल्या एका प्रकारच्या धाग्याचें करिता येतील असें डा. वाट यांचे ह्मणणें आहे. वेताची एक छडी घेऊन तिज भोंवती कोंबडीची किंवा खबुतरांची अथवा बगळ्याची रंगविलेली पिसें चिकटवून चिन देशांत पंखे तयार करितात. त्याचा साहेब लोक आरसे व कांचेचे इतर सामान झाडण्याकडे उपयोग करितात. अशा प्रकारचें पिसांचे कुंचे आमच्या देशांत उत्पन्न होण्यास कोणत्याही प्रकारची अडचण नसून अझूनपर्यंत कां होऊं लागलें नाहींत हें कळत नाहीं. पुण्यास मोरांच्या पिसांचे कुंचे करणारे जिनगर लोक आहेत तेंच असलें कुंचेही तयार करूं लागलें तर त्यांत त्यास विशेष फायदा होईल यांत संशय नाहीं.

 मोरचेल हें राज्य चिन्ह आहे त्याचा ज्या ज्या ठिकाणीं मराठी राजे आहेत तेथें तेथें आणि देवळांत व जैन लोकांच्या गुरूच्या येथें उपयोग होतो. पुणें, सांवतवाडी, मुंबई, व कोल्हापूर, यागांवीं मोरचेल तयार करणारे जिनगर लोक आहेत. पुणें येथील प्रदर्शनांत कोल्हापूर संस्थानांतून एक चांगले मोरचेल पाठविण्यांत आलें होतें.